बिदर-उदगीर-परळी रेल्वे सुरू करण्यासाठी उदगीर समितीचा संघर्ष*

*🚆बिदर-उदगीर-परळी रेल्वे सुरू करण्यासाठी उदगीर समितीचा संघर्ष*


 


*उदगीर रेल्वे संघर्ष समितीची मागणी *


 


उदगीर- कोरोनामुळे ठप्प झालेले जनजीवन अनलॉक नंतर हळूहळू पूर्ववत होत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने विविध विभागात काही महत्वपूर्ण गाड्या सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. त्या नुसार मध्य रेल्वे ने लातूर मुंबइ रेल्वे आठवड्यातुन चार दिवस सुरू करण्यास मान्यता दिली. मात्र उर्वरित तीन दिवस बिदर पर्यंत विस्तारीत झालेल्या या गाडीच्या फेऱ्याना अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे. या फेऱ्या लगेच सुरू कराव्यात व विकाराबाद -उदगीर- परळी या मार्गावरील नांदेड ते बंगलोर सारख्या महत्वपूर्ण गाड्या सुरू करण्याची मागणी रेल्वे संघर्ष समीतीने केली आहे. त्यासाठी समितीने संबंधित खासदारांना निवेदन देऊन पाठपुरावा सुरु केला आहे.


 


लातूर ते मुंबई गाडी सुरू करण्याचा निर्णय घेउन मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यातील प्रवाश्यांना प्रवासासाठी दिलासा मिळाला आहे. मात्र लातूर रोड, उदगीर, चाकूर, कर्नाटक सीमावर्ती व  भागातील भाविक व प्रवाश्यांसाठी मध्य रेल्वेची एकही गाडी सुरू होत नसल्याने नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्य रेल्वेने आठवड्यातुन चार दिवस गाडी क्रमांक २२१०७ व २२१०८ सुरू करण्याचा निर्णय घेतला ही समाधानकारक बाब असली तरीही उदगीर, लातुररोड, चाकूरसाठी एकही गाडी सुरू होत नाही यामुळे निराशा झाली आहे.


 


उदगीरसह सीमावर्ती भागातील विकासासाठी झगडणार्या उदगीर रेल्वे संघर्ष समितीने बिदर पर्यंतच्या विस्तारीत फेऱ्या गाडी क्रमांक २२१४३ व २२१४४ बिदर ते मुंबई सुरू व्हाव्या व विकाराबाद-जहिराबाद- बिदर- उदगीर-लातुररोड-परळी मार्गावर गाडी क्रमांक १६५९३ व १६६५९४ नांदेड ते बेंगलोर व गाडी क्रमांक ५७५४९ व ५७५५० औरंगाबाद ते हैद्राबाद सारख्या महत्वाच्या गाड्या सुरू होण्यासाठी पाठपुरावा सुरू केला असून संबंधित खासदारांना निवेदन देण्यास सुरुवात केली आहे.  नांदेड ते बंगलोर गाडी सुरू झाल्यास विकाराबाद येथे रॉयल सीमा गाडी जोडली असल्यामुळे मराठवाड्यातील तिरुपती भक्तांना सुलभ होणार आहे.  लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, बिदरचे खासदार भगवंत खुबा, बीडच्या खासदार प्रीतम मुंढे-खाडे, जहिराबादचे खासदार बी बी पाटील यांना निवेदन देऊन या गाड्या सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. 


 


 


*अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे प्रवाश्यांची गैरसोय...*


दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकारी यांच्या दुर्लक्षमुळे उदगीर व सीमावर्ती भागातील प्रवाश्यांची गैरसोय होत आहे.दसरा व दिवाळीच्या अनुषंगाने व कोरोनामुळे कोलमडलेला व्यवसाय पूर्ववत होण्यासाठी या गाड्या  करीता संबंधीत खासदार व रेल्वे प्रशासनाचा पाठपुरावा उदगीर रेल्वे संघर्ष समिती  करीत आहे.  


 


*मोतीलाल डोईजोडे, सचिव उदगीर रेल्वे संघर्ष समिती उदगीर*


 


*® ०४-१०-२०२०*