शासकीय व खाजगी रुग्णांलयात होणाऱ्या प्रसुती
अनावश्यक संदर्भित करणे टाळावे
लातूर, दि.8(जिमाका):-जिल्हयातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात होणाऱ्या प्रसुती अनावश्यक संदर्भित करणे टाळावे. अशा सूचना जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हयातील शासकीय व खाजगी रुगणालयातील प्रस्तुती बाबतच्या आढावा बैठकीत केल्या.
या बैठकीस विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठता डॉ.मोहन डोईबोळे, जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ.लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे,जिल्हयातील वैद्यकीय अधिक्षक , सर्व तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक केंद्राचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले की,जिल्हयातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये येणाऱ्या प्रसुती शक्यतो त्याच रुग्णालयात कराव्यात, उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कार्यक्षेत्रातील मातांची EDD/EPD च्या माहिती नुसार रुग्णांची माहिती घेण्यात यावी. ज्या प्रसुती स्वभाविक होणे अपेक्षित आहेत त्या उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरच करण्याच्या सूचना या वेळी त्यांनी दिल्या.
ज्या मातेच्या प्रसुती जोखमीच्या आहेत त्याची प्रसुती कोठे करावी या बाबत अगोदरच संबंधित संस्था स्तरावर वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्हा स्तरावर तयार करण्यात आलेल्या व्हॉट्अप ग्रुप मधील स्त्रीरोग तज्ञांशी समन्वय साधून संदर्भित करावयाचे ठिकाण निश्चित करण्यात यावे जेणे करुन रुग्णांस वेळेवर सेवा उपलब्ध् होईल.असे ही ते म्हणाले.
येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे दैनंदिन शासकीय रुग्णालयांतून संदर्भित करण्यात येणाऱ्या जोखमीच्या रुग्णांसाठी दैनंदिन दहा खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, तसेच स्त्री रुग्णालय लातूर येथे संदर्भित करण्यात येणाऱ्या रुग्णांपैकी काही रुग्ण् एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे संदर्भित करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
जिल्हयातील प्रत्येक रुगणालयांमध्ये प्रसुती आवश्यक मनुष्यबळ ,साधन सामुग्री,उपलब्ध् करण्याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या असून या मध्ये रुग्णांची हेळसांड होता कामा नये या बाबत सर्वांनी दक्षता बाळगावी असे जिल्हाधिकारी यांनी सूचित केले. या बैठकीस सर्व आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
****