वृक्षारोपण करुन वसुंधरा रत्न डाॅ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांना श्रध्दांजली
उदगीर(प्रतिनिधी) येथील माहेश्वरी मंगल कार्यालयात सत्संग मंडळाच्या वतीने वसुंधरारत्न, राष्ट्रसंत डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रारंभी श्री गुरु हावगीस्वामी मठाचे मठाधिश डाॅ.शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांचे हस्ते वसुंधरारत्न डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. पोस्ते परिवारांच्या वतीने सुरज पोस्ते व सौ.पोस्ते यांनी डाॅ. शंभुलिंग महारांचे पाद्यपुजन व १०८ जंगम अर्चना, आरती करण्यात आली.
यावेळी विरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, भाजपाचू प्रदेश चिटणिस नागनाथ अण्णा निडवदे, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे, विरशैव समाजाचे सचिव बाबुराव पांढरे, अँड. सुनिल रासुरे, राजकुमार बिराजदार आदी उपस्थित होते.
यावेळी श्री गुरु हावगीस्वामी मठाचे मठाधिश डाॅ. शंभूलिंग शिवाचार्य यांनी आपल्या आशिर्वचणात म्हणाले की, राष्ट्रसंत डाॅ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी संपुर्ण जिवन सकल मानव समाजाच्या कल्याणासाठी व्यतीत केले, डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज हे साक्षात संत शिरोमणी मन्मथ माऊलींचा अवतार होते. आध्यात्म आणि विज्ञानांची सांगड घालून आदर्श समाज निर्माणासाठी कार्य केले. गुरु हाच देव आहे असा विचार गूरु माऊलींनी घालून दिला. या पृथ्वीवर जोपर्यंत चंद्र, सुर्य असेल तोपर्यंत डाॅ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे नाव व त्यांचे कार्य अजरामर राहणार असल्याचे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, नागनाथ अण्णा निडवदे यांनी महाराजांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. गुरुमाऊलींनी लावलेला सदविचारांचा, राष्ट्रप्रेमाचा नंदादीप सतत तेवत ठेवण्याचा संकल्प व्यक्त करुन राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली वाहिली. महाराजांच्या स्मृती कायम स्मरणात राहव्यात म्हणून आमृवृक्षाचे डाॅ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करुन यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली. १०८ जंगम पूजा, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन सूरज पोस्ते यांनी केले होते. यावेळी राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य यांची भक्तमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. जंगम अर्चना कार्यक्रमास रतिकांत स्वामी, रामलिंग मठपती नागलगावकर, विशाल स्वामी, अजय मठपती हाळीकर, पवन स्वामी शेकापूरकर, शिवराज मठपती, बाबू स्वामी आदींनी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचलन शि.भ.प.शिलाताई मालोदे यांनी तर आभार राम मोतीपवळे यांनी मानले.