माणूसकीच्या निगेटिव्ह विचारांना पॉझेटिव्ह करणारी रोटी कपडा बँक
उदगीर - गेली सात महिन्यापासून संपूर्ण जगाला कोरोना महामारीने ग्रासले आहे. कोरोनाचे लक्षणे जरी सारखे असले तरी त्याच्या गतिमान प्रभावामुळे माणसामध्ये भीतीचे वातावरण इतके पसरले आहे की रक्ताचे नाते सुध्दा तोडत आहे. वेगवेगळ्या देशातील वातावरणानुसार कोरोनाच्या लक्षणाची विविध कारणे जाणवत आहेत.
भारतात तर याला कधी श्रीमंत - गरीबीचे तर कधी जाती -धर्माच्या रंगाने जोडले जात आहे. यामुळे कोरोना आता विषाणू किंवा संसर्गजन्य महामारी रोग नसून माणसातल्या मानातील खाऱ्या पॉझेटिव्ह व निगेटिव्ह विचारांची जाण करून देत आहे.
पण उदगीर येथील रोटी कपडा बँक या नावाने देशा- विदेशात पोहचलेल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी मुस्लिम धर्मातील असून कुराण या पवित्र धर्मग्रंथातून नमाज या पवित्र शब्दाचा अर्थ आपल्या सामाजिक कार्यातून दाखवून देत आहेत. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मानवता व गरजवंताना मदत करणे यापलीकडे दुसरे कांही माहित नाही. त्यांच्या कार्याची दखल घेऊन नगर परीषदेच्या वतीने चालवण्याात येणाऱ्या बेघर निवारा केंद्राची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. ही संस्था रोज शेकडोच्यावर निराधाराना सांभाळणे त्यांच्या जेवणाची, कपडयाची मोफत व्यवस्था करण्याची जबाबदारी पार पाडत आहे. या चार महिन्याच्या कडक लॉकडाऊनच्या काळात गोरगरींबाना, बाहेरगावच्या उदगीर मध्ये अडकलेल्या मजूरांना मोफत जेवण तर गरीब कुटुंबाना अन्न धान्याची किट वाटप व जेवणाची व्यवस्था करून माणवतेला लाजवेल असे पॉझेटिव्ह कार्य करत आहे.
कारण विविध जातीय सामाजीक संस्था असून फक्त प्रसिध्दीसाठी पुढाकार घेऊन लोकप्रतिनीच्या मागे पुढे फिरून समाजातून व शासनाचा निधी लुटणाऱ्या आहेत. विविध विवाह सोहळे, अन्नदान. मोठमोठयांचे वाढदिवस, जवळच्या नात्यातले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे व वर्तमानपत्रातून व सोशल मिडियातून प्रसिद्धी मिळवतात. पण याच संस्थांना या कुटुंबाची आठवण का आली नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.
अशीच एक घटना उदगीर येथे घडली असून जंगम समाजातील घटस्फोटित महिलेवर जिवंत असताना वाईट वेळ आलीच पण मृत्यू नंतरही रक्ताच्या नात्याने व नातेवाईकांनी साथ सोडली. पण देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण आहे म्हणजे देव ज्याला जन्माला घालतो त्याची सोय करतो.
उदगीर येथील पेठ दरवाजा परीसारात एक घटस्फोटीत महिला गेल्या दहा वर्षापासून आपल्या दोन मुलांना घेऊन राहत होती. दि. १ ऑगस्टच्या पहाटे ४ ते ५ दरम्यान आजाराने आकस्मीत मृत्यू झाला. सध्या कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमुळे नागरीकात भीतीचे वातावरण पसरले आहे. या महिलेचा आकस्मीत मृत्यू झाल्यामुळे अंत्यविधी पूर्ण करण्यासाठी शेजारी व नातेवाईक पुढाकार घेत नव्हते. यावेळी एकाही सामाजीक संस्थेला या कुंटुबाच्या अडचणीची जाणीव झाली नाही. अखेर वडिलांनी व सासरच्यांनी अंत्यविधीसाठी शहर पोलिस स्टेशन येथे अर्ज देऊन रोटी कपडा बँकेची मदत मागीतली व नगर परीषदेचे मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रोटी -कपडा बँकेचे शेख गौस खूर्शीद, खूर्शाद आलम, शेख समीर, शेख ए. रहीम,लदाफ दस्तगीर महेबूब, अमजद मणियार, अर्जुमंन शाहिन व आदींनी पुढाकार घेऊन हिंदू प्रथेप्रमाणे या घटस्फोटीत महिलेची अंत्यविधी अखेर पार पाडली.या स्वयंसेवकांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. याच सोबत दोन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारण्यात तयार आहे.