मराठी मंडळ तैवानतर्फे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

मराठी मंडळ तैवानतर्फे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा



  गणपती हा तसा तमाम मराठी माणसाचा आवडता सण, माणूस लहान असल्यापासूनच त्याला गणपतीच्या सणाची गोडी लागलेली असते आणि आपली माणसं कुठंही गेली की आपले सण सोबत घेऊन जातात. मराठी माणसांचा जिव्हाळयाचा असलेला गणेश चतुर्थीचा सोहळा हा जगभर जिथं जिथं आपली माणसं आहेत तिथे साजरा होत आहे. असाच एक सुंदर सोहळा तैवानची राजधानी असलेल्या तैपेई शहरात शनिवार दिनांक २९ रोजी मोठ्या उत्साहात पार पाडला. तैपेई मधील फुकुयामा ऍक्टिव्हिटी सेंटर येथे सार्वजनिक गणेश पूजा आयोजित करण्यात आली होती, यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तैवानमधील भारतीय दूतावासाचे राजनयिक अधिकारी बिजोय दास उपस्थित होते. जगावर दाटलेले कोरोना विषाणूचे संकट लवकर दूर होऊन व सकल मानवजातीला सुरक्षित जीवन प्रदान कर, अशी प्रार्थना यावेळी बाप्पाकडे करण्यात आली.  


   भारतीय सण, संस्कृती आणि खाद्य परंपरा ही आपली एक ओळख असून परदेशात देखील आपण ती जपत आहोत, यातून संस्कृती रक्षण तर होतेच परंतु मनाला एक नवीन उत्साह प्राप्त होतो असे मनोगत बिजोय दास यांनी यावेळी व्यक्त केले.


    तैवानमध्ये भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यात मराठी भाषिक देखील मोठ्या संख्येने शिक्षण आणि व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्राबरोबरच देशातील विविध भागातील मराठी भाषिक इथे वास्तव्यास असल्याने वैविध्यपूर्ण मराठी समाज एकत्र आलेला दिसून येतो. येथील मराठी मंडळ तैवानतर्फे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. इथं असलेल्या मराठी भाषिकांमध्ये घरगुती गणपती बसविणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे आणि त्यासाठी विशेष प्रोत्साहन देण्यासाठी घरगुती गणेश सजावट स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. यात तैवानमधील तैपेई, ताओ-युआन, सिंचू, तैनान, तायचुंग, काओ-शुंग आदी शहरातील बऱ्याच कुटुंबीयांनी आपला सहभाग दर्शविला. यावेळी पूजेसहित प्रीतिभोजन, गायन, नृत्य प्रश्नमंजुषा असे अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी तैपेईमधील किलुंग नदीमध्ये श्रीगणेश विसर्जन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तैवान मराठी मंडळाचे सदस्य पंडित आंब्रे, सचिन इचके, संदीप वाघ, बालाजी बर्वे, रविराज काळुंके, सुहास बावीकर, धैर्यशील चेंडके, राम आंब्रे, कृष्णा बोर्डे, राजेंद्र परांडे, रोहन पाष्टे, संदीप ढोले, रेवण कट्टे, राहुल कर्डीले, मनोज पाटील, सयाजी मोरे, संजय मदने, सुनील थरगे, हर्षल वाणी, अमोल नारखेडे, गणेश महाजन आदींनी विशेष परिश्रम घेतले.