श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाला
जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस.श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला,म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.
हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ,मथुरा,वृंदावन,द्वारका,जगन्ना पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो.ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे. गुजराथमध्ये सातम म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून दिवसभर वेगवेगळे खेळ खेळतात.रात्री बारा वाजता खेळ बंद करून कृष्णजन्माचा उत्सव सुरू करतात.
कृष्ण जयंतीचा उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात.दहीहंडी आणि कृष्णजन्माष्टमी यांच्या निमित्ताने हा प्रसाद तयार केला जातो. श्रीकृष्णजयंती व्यतिरिक्त वर्षभरात जेव्हा जेव्हा काल्याचे कीर्तन होते तेव्हा तेव्हा त्या कीर्तनानंतर गोपाळकाला होतो.म्हणूनच त्या कीर्तनाला "काल्याचे" कीर्तन म्हणतात. ज्ञानेश्वरीचे किंवा दासबोधाचे पारायण, किंवा अनेक दिवस चालणाऱ्या अशाच एखाद्या ग्रंथवाचनानंतर,अथवा कीर्तन महोत्सवामध्ये शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते.वारकरी संप्रदायात वारीची सांगता गोपाळकाला करूनच होते.
कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो.महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दहीकाला होतो.श्रीकृष्ण त्याच्या बालपणी आपल्या मित्रांसह गोकुळातील घरांमध्ये जाऊन टांगलेल्या शिंकाळ्याच्या मडक्यातील दही खात असे.त्यासाठी मुले मानवी मनोरा करून मडके फोडीत असत.ही परंपरा आजही भारतात दहीहंडीच्या रूपाने साजरी केली जाते.गोविंदा आला रे आला,गोकुळात आनंद झाला असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात.कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. गोपाळकाला व त्यामध्ये ठेवलेली बाळकृष्णाची मूर्ती गोपाळ म्हणजे गायींचे पालन करणारा.काला म्हणजे एकत्र मिसळणे.पोहे,ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या,लिंबाचे वा आंब्याचे लोणचे,दही,ताक,चण्याची भिजविलेली डाळ,साखर,फळांच्या फोडी इत्यादी मिसळून तयार झालेला हा एक खाद्यपदार्थ असतो.हा कृष्णास फार प्रिय होता,असे सांगितले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व सर्वजण वाटून खात असत असे मानले जाते.
एक दिवस कृष्णाने सकाळीच घाइघाईत सगळ्या त्याच्या सवंगड्यांना आवाज दिला अन् सर्वांना आपापल्या घरात जे काही शिळेपाके आहे त्याच्या शिदोर्या घेऊन रानाकडे कूच करण्यास सांगितले.दुपारी गाईंना चरावयास सोडल्यावर सगळ्यांनी आपापल्या शिदोर्या सोडल्या. श्रीकृष्णाने त्या सगळ्या शिदोर्या एकत्र करून त्याचा काला केला.नंतर तो काला सर्वजण एकमेकांना प्रेमाने भरवू लागले.असा कृष्णाच्या हातचा अमुल्य प्रसाद आपल्यालाही मिळावा म्हणून देवादिक माशांच्या रूपाने येऊन यमुनेत उतरले.पण कृष्णाच्या सवंगड्यांची कृष्णावर जशी भक्ती होती,श्रध्दा होती.त्यामुळे त्यांना कृष्णाने दिलेला काला देवांना कसा मिळेल?
कृष्णासह त्याच्या सवंगड्यांनी काला खाल्ल्यावर कृष्णाने त्यांना हातही धुवू दिले नाहीत.त्या काल्याचा सुवास सगळयांनी त्यांच्या घरच्यांना दिला. त्यावर तुम्ही खूप भाग्यवान आहात. साक्षात भगवंताच्या हातचा प्रसाद तुम्हाला मिळाला.आम्ही मात्र त्याला मुकलो,असे म्हणून गोकूळवासी हळहळले.त्या काल्याचा घास कृष्णाने मुखात घालता क्षणी सर्वांना अवीट रसाची गोडी चाखायला मिळाली.त्या काल्याच्या आठवणीसाठी आजही गोकुळाष्टमीनंतर गोपाळकाला केला जातो.
त्यात दही,दूध,लोणचे,लाह्या,कुरमुरे, पोहे पापड इतकेच नव्हे तर त्यात भाकरीही कुसकरून घालतात.खरंच तो काला खाल्ल्यावर एक वेगळीच अविस्मरणीय चव जिभेवर रेंगाळते. इतर दिवशी असे पदार्थ एकत्र केले तर त्यात कदाचित तो रस राहणार नाही. तो कृष्ण भक्तीचा रस,कृष्णाच्या व त्याच्या सवंगड्यांच्या मैत्रीचा रस त्या काल्याला अमृताची गोडी मिळवून देतो.मात्र यावर्षी कोरोना विषाणूच्या संकटामुळे आपण दरवर्षी प्रमाणे आनंद घेवू शकणार नाहीत.तेंव्हा घरीच रहा...सुरक्षित रहा...!!! अशा या श्रीकृष्ण जयंतीच्या व गोपाळकाल्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!!
राजेंद्र लाड (आष्टी,जि.बीड)
मो.९४२३१७०८८५