वाळकेवाडी ता. हिमायतनगर  शाळकरी मुलगा रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी...

वाळकेवाडी ता. हिमायतनगर  शाळकरी मुलगा रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी...


शिवारात रान डुकरांचा हैदोस....वनविभाग अनभिज्ञ..



     हदगाव तालुका प्रतिनिधी:- वाळकेवाडी ता.हिमायतनगर येथील शेतकरी रावजी नागोजी भुरके यांची शेती मौजे दुधड शिवारात असून ते अल्पभूधारक शेतकरी आहेत,शेती शिवाय मजुरी करतात,आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच आहे,नित्य नियमानुसार दि.२८-०८-२०२० त्यांच्या पत्नी कापूस पिकात खुरपणी करत असताना त्यांच्या सोबत मुलगा रामप्रसाद रावजी भुरके वय १२ वर्ष हा सहावीत असलेला मुलगा लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने आई सोबत शेतात गेला होता,दुपारच्या वेळी तो खेळत असताना रानडुकराने या शाळकरी मुलावर हल्ला केला.त्या हल्ल्यात मुलाच्या डोळ्याच्या खालच्या बाजूस जबर दुखापत झाल्याने मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाला असून त्या बालकांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


     सर्वत्र हिरवळ असल्याने वन्यप्राण्यांचा वावर सर्वत्र वाढताना दिसतो,रानडुकराची तर संख्या अतिशय झपाट्याने वाढत असून हे प्राणी जंगली भागातून सखल भागात येत असून शिवारातील पिकात कामे करणाऱ्या शेतकरी बांधवांना त्याच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो.


  कोणत्याही वन्यप्राण्यांकडून हल्ला झाल्यावर वन विभागाकडून आर्थिक मदत दिली जाते पण या गरीब मुलाला अजून शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही,या प्रकरणी तालुक्यातील वन विभाग पूर्णपणे अनभिज्ञ आहे,जखमी मुलाला तात्काळ आर्थिक मदत मिळावी आणि वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.. याशिवाय हदगाव तालुक्यातील वाळकी बाजार परीसरात काही आठवड्यांपूर्वी वन्य प्राण्यांची शिकार झाली होती त्या प्रकरणातील एकाला वन विभागाने ताब्यात घेतले आहे परंतु त्याचा पुढील चौकशी अहवाल अद्यापही वनविभागाकडे आला नाही त्यामुळे या प्रकरणाची चौकशी गुलदस्त्यात आहे की काय असा प्रश्न वन प्रेमी नागरिकांकडून होत आहे