स्वयंसहायता समूहातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी
*-मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल*
*जवळगा येथील स्वयंसहायता समूहातील महिलांनी गणेश मूर्ती विक्रीतून कमावले 3 लाख 40 हजार रुपये*
लातूर, दि. 21(जिमाका):- देवणी तालुक्यातील जवळगा या गावातील महादेव स्वयंसहायता समूह व ओंकारेश्वर स्वयंसहायता समूह यांनी एकत्रित येऊन गणेश मूर्ती निर्माण करण्याचा उद्योग सुरू केला. एक लाख दहा हजाराच्या गुंतवणुकीतून साडेचार लाखाचा व्यवसाय केला व 3 लाख 40 हजाराचा निव्वळ नफा एका महिन्याच्या कालावधीत कमावला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी जवळगा गावातील महादेव स्वयंसहायता समूह व ओंकारेश्वर स्वयंसहायता समूह मधील सर्व महिला कारागिरांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले तसेच या समूहाच्या मूर्तींची व त्यांनी बनवलेल्या इतर वस्तू विक्री ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
महादेव व ओंकारेश्वर स्वयंसहायता समूह या दोन्ही बचत गटातील 16 कुशल महिला कारागीर एकत्र आले. एक लाख दहा हजार रुपयांची गुंतवणूक करून दोन फुटापर्यंत च्या दोन हजार व चार फुटापर्यंत च्या 20 हजार आशा एकूण 22 हजार गणेश मूर्तींचे निर्माण केले. या बचत गटांनी तयार केलेल्या मूर्तींची विक्री गाव तालुका व जिल्हा स्तरावर करण्यात आलेली असून त्यांच्या संपूर्ण मूर्ती विक्रीतून साडेचार लाखाचा व्यवसाय झालेला आहे. या दोन्ही गटांची गुंतवणूक वगळून तीन लाख 40 हजारांचा निव्वळ नफा झालेला आहे अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष जोशी यांनी दिली आहे.
या समुहांतील महिलांनी मातीची भांडी, शाडूच्या मुर्ती, काचेच्या आवरणातील भेट वस्तु, लक्ष्मीचे मुखवटे, हात, तसेच उत्कृष्ट प्रकारचे कापडी मास्क निमिर्ती करुन उपजिवीकेची साधने तयार केलेली आहेत. या समूहातील महिला कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने मूर्ती व इतर वस्तू बनवून आपली उपजीविका करून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या आदर्श जिल्ह्यातील इतर महिला बचत गट व समूहातील महिलांनी देवा असे आव्हान मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी केले.
*तसेच यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी व मुख्य वित्त लेखा अधिकारी प्रयत्न राज जवळगेकर यांनी प्रत्येकी हजार रुपये देऊन या समूहाने कौशल्याधारित बनवलेल्या सुबक अशा गणेशाच्या मूर्तीची खरेदी केली व त्यांच्या कामाला प्रोत्साहन देऊन कामाचे कौतुक केले*.
*********