कोरोना चाचणी निगेटिव्हचे ओळखपत्राला फुटले पाय !

कोरोना चाचणी निगेटिव्हचे ओळखपत्राला फुटले पाय ! 


महानगरपालिकेचा भोंगळ कारभार प्रशासन करते काय ?




{  जिल्हा प्रतिनिधी } 


लातुर : दि. १२ - लातूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरांमध्ये श्री शिवछत्रपती ग्रंथालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क टाऊन हॉल, समाज कल्याण इमारत कव्हा रोड, आदी वेगवेगळ्या ७ ठिकाणी कोरोना अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. या टेस्टसाठी शहरातील व्यापारी, हमाल, रिक्षाचालक, भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, सर्व प्रकारचे व्यवसायिक यांच्या टेस्ट केल्या जात आहेत. ज्या व्यापाऱ्याकडे किंवा व्यवसायिकाकडे कोरोना चाचणी केल्याचे ओळखपत्र नसेल तर अशा व्यापाऱ्यांना आपली दुकाने उघडता येणार नाहीत. असा दंडक प्रशासनाने घातलेला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी अशी कोरोना रॅपिड टेस्ट करणे चालू आहे, तेथे लोकांनी प्रचंड गर्दी केली असून सामाजिक अंतर पाळण्या बाबतचा पार बोजवारा उडाला आहे. या झालेल्या गर्दीमुळे अनेकांना तपासणी न करताच वेळ संपली उद्या करून घ्या असे सांगून लोकांना परत पाठवले जात आहे. मात्र त्या ठिकाणावरुन कोरोना निगेटिव्ह ओळखपत्र त्यांच्या हातात दिले गेले आहेत. अशा महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे कोरोनाची तपासणी न करताही निगेटिव्ह प्रमाणपत्र मिळाले असलेले लोक बिनधास्तपणे आपापल्या घरी निघून गेले आहेत.  


आमच्या हाती लागलेल्या सावेवाडी विभागातील त्रिमुर्ती नगर येथील मगर परिवारातील ५ निगेटिव्ह ओळखपत्रातील महेश मगर यांच्या ओळखपत्रावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची सही व शिक्का आहे. मात्र त्यांच्याच परिवारातील अन्य ४ ओळखपत्रावर सही शिक्का किंवा तारीखही नाही. हे ओळख पत्र खरे आहेत की बोगस आहेत हाच प्रश्न निर्माण होतो. का महेश मगर यांनीच त्यांच्या दुकाना शेजारी असलेल्या प्रेस मधून छापून घेतले याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.


" कोरोना योद्धा " प्रमाणपत्राचा ज्याप्रमाणे सर्वत्र सुळसुळाट झालेला आहे. तसेच लातूर महानगरपालिकेच्या या कोरोना निगेटिव्ह ओळखपत्राचे झालेले आहे. अनेकांना दिलेल्या ओळखपत्रावर तारीखही नाही आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची सही व शीक्का ही नाही. विना सही शिक्क्याचे असे बाहेर दिसत असलेले कोरोना निगेटिव्ह ओळखपत्र एखाद्या प्रिंटिंग प्रेस वाल्याकडून छापून घेऊन सुद्धा याचा काळाबाजार करून लोकांना दिले जाऊ शकतात. असे बेजबाबदार पणाने कोरोना निगेटिव्हचे ओळखपत्र देणारे कर्मचाऱ्यावर महानगरपालिका प्रशासन कार्यवाही करणार का ? लातूर जिल्हाधिकारी या कोरोना निगेटिव्ह ओळखपत्राच्या वाटपाकडे लक्ष देणार का ? असा प्रश्न लोकात चर्चिला जात आहे.