बहुमत असलेल्या भाजपला राष्ट्रवादीचा हाबाडा!
पं.स.अविश्वास ठराव मंजुर उदगीर (एल.पी.उगीले) उदगीर पंचायत समिती सभापतीपदी भारतीय जनता पार्टीचे विजयकुमार निळकंठराव पाटील हे 31 डिसेंबर 2019 रोजी लॉटरी पद्धतीच्या चिठ्ठीवर विजय झाले होते. 14 सदस्य असलेल्या उदगीर पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाकडे 9, काँग्रेस पक्षाकडे तीन, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे प्रत्येकी एक असे संख्याबळ असतांना देखील भारतीय जनता पक्षाच्या बंडखोरांनी पक्षआदेशाला केराची टोपली दाखवत बंडखोरीचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. भारतीय जनता पक्षाचाच अध्यक्ष व्हावा. यासाठी माजी आमदार गोविंदांना केंद्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके, यांच्यासह माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी प्रयत्न केले असल्याची चर्चा आहे. मात्र या कोणत्याही नेत्याची विनंती न ऐकता भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला साथ देत भाजपाच्या सभापतींना पायउतार व्हायला भाग पाडले. येणाऱ्या काळात सभापतीपदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव मुळे यांची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झाले आहे. भारतीय जनता पक्षामध्ये विधानसभा निवडणुकीपासून बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. जे पक्षाला त्रास देतील, आपली उपद्रव शक्ती दाखवतील त्यांनाच पक्षात संधी मिळत असल्याने प्रत्येकाच्या मनामध्ये आपापली उपद्रव शक्ति दाखवून देण्याची मानसिकता बनत चालले आहे. लोकसभा निवडणुकीच्या नंतर उदगीर विधानसभा मतदार संघातून जवळपास 60 हजारांचे मताधिक्य भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात असताना विधानसभेच्या निवडणुका मात्र भाजपाच्या गद्दारांनी पक्ष द्रोह केल्यामुळे भाजपला सपाटून मार खावा लागला. परिणामतः राष्ट्रवादीचे संजय बनसोडे तब्बल बावीस हजार मताधिक्याने विजयी झाले. यानंतर सरळसरळ भारतीय जनता पक्षामध्ये पडलेली उभी फट वेळोवेळी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे कार्यकर्त्यांना बंडखोरीची हिम्मत झाल्याची चर्चा सर्वत्र चालू आहे. एका अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या अस्तित्वाला उदगीर परिसरात आता शह भेटायला सुरुवात झाली आहे. या अविश्वास ठरावाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाची उतरती कळा लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाल्याने येणाऱ्या आगामी काळात भारतीय जनता पक्षाला प्रत्येक निवडणुकीत दारुण पराभवाला पुढे जावे लागेल. असेच चित्र निर्माण झाले आहे. आणि हे चित्र निर्माण व्हायला भारतीय जनता पार्टीतील गद्दार कारणीभूत असल्याची खुली चर्चा सर्वत्र चालू आहे. उदगीर पंचायत समितीमध्ये अकरा विरुद्ध तीन अशा पद्धतीने अविश्वास ठराव पारित झाला.
चौकट...... सदस्य प्रवेशद्वारातून आत जाण्यापूर्वी भाजपच्या बऱ्याच नेत्यांनी दारावर गर्दी केल्यामुळे पोलिसांना सोम्य छडी मार करावा लागला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उदगीर शहरात सात दिवसाचा गणपती बसत असल्यामुळे विसर्जनाच्या निमित्ताने जिल्हाभरातील पोलीस यंत्रणा शहरात असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.काॅंग्रेसचे ज्येष्ठनेते राजेश्वर निटूरे,बाजार समिती सभापती मुन्ना उर्फ सिध्देश्वर पाटील यांच्यासह राष्र्टवादीच्या नेत्यांनी आनंदोत्सव साजरा केला.