बैल पोळा” कायद्याच्या अमंलबजावणी सह साजरा.

बैल पोळा” कायद्याच्या अमंलबजावणी सह साजरा.



*लातूर*: - कोवीड १९ चे संकटाला समोर जात असतांना आज पोळा हा बैलांचा सण शासनाने ठरवून दिलेली नियमावली व आदेशानुसार पालन करीत सुडे परिवाराने साजरा केला तसे पाहता श्रावण महिन्यात सणांची रेलचेल पहायला मिळते. अनेक सण या महिन्यात आपल्याला भेटीला येतात. पावसाचे दिवस असल्याने सृष्टी आधीच हिरवाईचा शालु नेसुन नवीकोरी झालेली असते. संपुर्ण वातावरणात एक गारवा पसरल्याने मानवी मन देखील ताजं तवानं झालेलं असतं


अश्या या श्रावण महिन्यात आपण नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यांसारखे सण साजरे करतो आणि या श्रावण महिन्याची सांगता होते ती श्रावण महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या पोळा या सणाने….


“बैल पोळा” या सणाबद्दल 


श्रावण अमावस्येला अर्थात पिठोरी अमावस्येला शेतकरी बांधव आपल्या सर्जाराजाचा हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतांना आपल्याला दिसतात.पुणे मुंबई यांसारखी मेट्रो शहरं या सणाविषयी कदाचीत अनभिज्ञ असावीत एवढी वाढली आहेत या शहरांची धावपळ पाहिली की पोळा या सणाची यांना काही माहिती आहे की नाही असे वाटते. परंतु या शहराच्या आसपासची गावं आणि संपुर्ण महाराष्ट्रात बळीराजा मात्र आपल्या जिवाभावाच्या सोबत्याचा हा सण अत्यंत पारंपारीक पध्दतीने आजही साजरा करतांना दिसतो.


पोळा या सणाच्या आदल्या दिवशी बैलांना रितसर आमंत्रण देण्याची पध्दत आहे बरं का.


“आज आवतन घ्या उद्या जेवायला या!”


 


असं आमंत्रण या बैलांना दिलं जातं. दुसऱ्या दिवशी सकाळी बैलांना नदीवर न्यायचं, त्यांना झकास अंघोळ घालायची. घरी आणल्यावर त्यांच्या सर्वांगावर गेरूने ठिपके द्यायचे, शिंगाना बेगड, डोक्याला बाशिंग, गळयात कवडया आणि घुंगरांच्या माळा घातल्या जातात. पायांमधे चांदीचे किंवा करदोडयाचे तोडे घालतात. नवी वेसण नवा कासरा घातल्यानंतर अंगावर रेशमी नक्षीकाम केलेली झुल पांघरली जाते. बैलांचा गोठा स्वच्छ करण्यात येतो. घरातील सुवासीनी बैलांची विधीवत पुजा करतात.बैलांना पोळयाच्या दिवशी कोणतेही काम करू दिले जात नाही. गोडाधोडाचा पुरणपोळीचा घास त्याला भरवला जातो. बैलाची कायम निगा राखणाऱ्या गडयाला नवे कपडे दिल्या जातात.बैलांचे जेवण झाल्यानंतर सायंकाळी त्यांना गावाबाहेर मंदिरात नेले जाते. सर्व शेतकरी आपापल्या जोडया घेउन एका ठिकाणी एकत्र येतात. आंब्याच्या पानांचे तोरण बांधुन बैलांना रांगेत उभे करण्यात येते. ढोल ताशे नगारे वाजवले जातात.


झडत्या (पोळयाची गितं) म्हंटली जातात. येथे बैलांच्या शर्यती देखील आयोजित केल्या जातात. ज्याच्या जोडीला सर्वात चांगले तयार केले असेल त्या जोडीला पारितोषीक दिले जाते. आपापल्या गावातील परंपरेनुसार उत्सव साजरा झाल्यानंतर कार्यक्रम संपन्न होतो. घरी निघतांना बैलांना घरोघरी नेल्या जाते तेथे आयाबाया बैलांची पुजा करतात. बैल नेणाऱ्यास ’बोजारा’ (पैसे) देण्यात येतो.


हिंदु संस्कृतीत वृक्षांप्रमाणेच वन्यजिवांना देखील पुजनीय मानल्या जातं. वर्षभर शेतात शेतकऱ्यासमवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलाप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणुन पोळा या सणाकडे आपण पाहातो.पुर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरांप्रमाणे हे उत्सव आजही गावागावांमधुन साजरे होतांना आपल्याला दिसतायेत.अश्याच प्रकारे लातुरातही सुडे परिवारांनी पोळा सण साजरा केला