लाच घेताना तलाठी सापडला!!!

लाच घेताना तलाठी सापडला!!!


 


उदगीर ( प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील मौजे हेर शिवारातील शेतीचा वाटणी पत्राच्या आधारे फेयर करून सातबाराला नोंद घेण्यासाठी, तलाठी प्रमोद माधवराव सूर्यवंशी (40 वर्ष) नेमणूक तहसील कार्यालय उदगीर सज्जा कुमठा व हेर यांनी तक्रार पाच हजार रुपयाची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी यासंदर्भात लातूर जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष असलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक माणिक बेद्रे यांच्यावर विश्वास ठेवून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिनांक 13 ऑगस्ट 2020 रोजी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास विवेकानंद चौक येथील होंडा शोरूमच्या समोर लाच स्वीकारली. आरोपीने स्वतःलाच स्वीकारल्यामुळे सापळा रचून बसलेल्या या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लगेच त्याला ताब्यात घेतले. उदगीर तालुक्यात यापूर्वीही अशाच पद्धतीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची उत्कृष्ट कामगिरी झाली होती. यात गटविकास अधिकाऱ्यांसह त्यांचा साथीदार यांच्यावर कारवाई झाली होती. या कारवाईचा विसर पडतो न पडतो तोच, पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सक्रिय झाला आहे. लाचखोरांच्या मुसक्या आवळण्याचे काम गतीने सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांच्या तक्रारीची तात्काळ नोंद घेत, लाच मागितल्याची पडताळणी आणि प्रत्यक्ष स्वतः आरोपी लाच घेत असताना ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलीस उपाधीक्षक माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, कुमार दराडे आणि त्यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


        लाच देणे आणि घेणे गुन्हा असून कोणताही लोकसेवक अशा पद्धतीची लाचेची किंवा बक्षिसाची मागणी करत असेल तर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांच्याशी संपर्क साधावा. असेही आवाहन उपाधीक्षक माणिक बेद्रे यांनी केले आहे.