त्या' शाळेची मान्यता रद्द करुन, गटशिक्षणाधिकारी व केंद्र प्रमुखावर कार्यवाही करण्याची मागणी
उदगीर/प्रतिनिधी-उदगीर शहरालगत असलेल्या अक्षर नंदन शाळेत कोरोना संकट काळात दहावीचे वर्ग भरविण्यात आले. शासनाचे आदेश पायदळी तुडवीत शाळा भरविण्यात आली असल्यामुळे या शाळेची मान्यता रद्द करावी व शाळेवर कसलीही कार्यवाही न करणाऱ्या गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख यांना निलंबित करावे अशी मागणी संविधान संघर्ष अभियानचे अध्यक्ष बाबासाहेब सुर्यवंशी यांनी केली आहे.
राज्य व देशात कोरोना रोगाने थैमान घातले आहे. या रोगापासून सुरक्षित राहण्यासाठी सर्व उद्योग, शाळा व सार्वजनिक ठिकाणे आदी पुढील आदेश येईपर्यंत बंद आहेत. विशेष म्हणजे शाळा- महाविद्यालय बंद करून काही वर्गाच्या परिक्षाही रद्द केल्या. कोरोनाचा धोका लहान मुलांना आधिक असल्यामुळे विशेष काळजी घेतली जात आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाचे अद्याप योग्य निर्णय झाला नाही. अशात उदगीर येथील अक्षर नंदन शाळेत दहावी वर्गाची तुकडी भरवली जात असल्याचे उघड झाले आहे.
कोरोना काळात सर्वकाही बंद असताना शासनाचे आदेश पायदळी तुडवित अक्षर नंदन विद्यालयात शाळा भरी एका वर्गात ३० ते ३५ विद्यार्थी बसविण्यात येत होते. त्याच्या अरोग्याची कसलीच काळजी घेतली जात नव्हती. हे प्रकरण उघड झाल्यानंतर ही गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखांनी कसलीच कार्यवाही केली नाही. उलट सदर संस्थेला मदत कशी करता येईल व हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न या दोघानी केले. त्यामुळे संस्थेची मान्यता रद्द करून गटशिक्षणाधिकारी व केंद्र प्रमुख यांच्यावरही कार्यवाही करावी आशी मागणी बाबासाहेब सुर्यवंशी यांनी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.