राज्य उत्पादन शुल्क विभागाची पुन्हा धाड!!!
अवैद्य बेकायदेशीर दारू विकणाऱ्याला केले गजाआड!!!
लातूर (एल.पी. उगिले) देशामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग थैमान घालत आहे. सोशल डिस्टंसिंग पाळली जावी, गर्दी होऊ नये. यादृष्टीने शासनाकडून परमिट रूम, बार आणि मद्य विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. असे असले तरीही तळीरामांकडून आपली हौस,व्यसन आणि गरज भागवण्यासाठी मिळेल त्या मार्गाने मद्य मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.. तळीरामांची ही धडपड आणि गरज विचारात घेऊन काही संधीसाधू लोक अवैद्य, बेकायदेशीर मद्य विक्री करून आपली तुंबडी भरण्याचा प्रयत्न करत असतात. कित्येक वेळा सदरील अवैद्य व बेकायदेशीर मद्य हे नवसागर मिश्रित तथा विषारी असू शकते. त्याचे गांभीर्य विचारात घेऊन व कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा 15 जुलै ते 30 जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. अशा पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक श्रीमती उषा वर्मा, जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी जिल्ह्यात अवैद्य, बनावट, बेकायदेशीर मद्य विक्रीवर प्रतिबंध घालण्याचे निर्देश दिलेले आहेत. या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त निलेश सांगडे, लातूर विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये अवैध, बेकायदेशीर मद्य विक्री, निर्मिती व वाहतूक या विरोधामध्ये धडक कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. यापूर्वी बनावट मद्य निर्मिती आणि विक्री प्रकरणांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने फार मोठी कामगिरी केली आहे. त्यानंतर दिनांक 15 जुलै रोजी रेणापूर तालुक्यातील मौजे खरोळा येथे अवैद्य मद्य विक्री विरोधात गुन्हा नोंद करून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. अवैद्य आणि बेकायदेशीर भारतीय बनावटीचे विदेशी मद्य 26 लिटर तर देशी मद्य 45 लिटर जप्त करण्यात आले. सदरील मुद्देमालाची किंमत 43 हजार दोनशे रुपये च्या जवळपास आहे. या मोहिमेमध्ये निरीक्षक आर. एम. बांगर, दुय्यम निरीक्षक एस. आर. राठोड, जवान एच. एस. मुंडे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही धडक मोहीम अशीच चालू राहणार असून अवैद्य व परराज्यातील मद्यविक्री, वाहतूक, बनावट मद्य निर्मिती होत असल्यास याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला तात्काळ माहिती कळवावी. असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे यांनी केले आहे.