शेतकऱ्यांची लुबाडणूक केल्यास व्यापार्‍यांची धिंड काढणार-- किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस फुलारी

शेतकऱ्यांची लुबाडणूक केल्यास व्यापार्‍यांची धिंड काढणार-- किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस फुलारी



 उदगीर -जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. काही भागात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. त्यामुळे आता शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. याच संधीचा गैरफायदा घेऊन ग्रामीण भागातील कृषी केंद्र शेतकऱ्यांना वाढीव भावांने खते, बी-बियाणे विक्री करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. तसेच शेतकऱ्यांनी मागितलेल्या नेमक्या खताच्या प्रकारातील खत कृत्रिम रित्या टंचाई करून मन मानेल त्या भावाने विक्री करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. अशी तक्रार शेतकरी वर्गातून चर्चिली जात आहे. असा प्रकार आढळून आला तर, लातूर जिल्हा किसान मोर्चाच्या वतीने अशा व्यापाऱ्यांची धिंड काढली जाईल. असा इशारा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण फुलारी (भालके) यांनी दिला आहे. शेतकऱ्याला उद्देशून बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या बियाण्यांची   पक्की पावती घ्यावी. तसेच ज्या कंपनीचे बियाणे घेतले आहेत,  त्याची पिशवी ही सांभाळून ठेवावी. गेल्या काही वर्षापूर्वी उदगीर शहरालगत असलेल्या लोणी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सोयाबीनच्या बोगस बियाणांचा कारखाना आढळून आला होता. सध्या संपूर्ण देश कोरोनाविषाणू च्या संसर्गाच्या भितीने संकटात सापडला आहे. त्यात शेतकर्‍यांची तर फार मोठी गोची झाली आहे. अशा प्रसंगी शेतकऱ्याची फसवणूक किंवा लुबाडणूक करण्याचे पाप जर कोणी व्यापारी करत असेल तर  महसूल प्रशासन किंवा कृषी खात्याची संपर्क साधावा. असेही आवाहन लक्ष्मण फुलारी यांनी केले आहे. लातूर जिल्ह्यामध्ये या वर्षी खरिपाचे सहा लाख साठ हजार इतक्या क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन हे पीक घेतले जाते. तसेच नगदी पीक म्हणून उडीद, मूग, तूर यांचाही बर्यापैकी पेरा असतो. खरीप ज्वारी या पिकांचीही पेरणी केली जाते. यंदा सरासरी एवढा पाऊस पडेल. असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी खते आणि बियाणे ही खरेदी करताना अधिकृत दुकानदाराकडून खरेदी करावीत. तसेच दुकानदाराकडून पक्के बिल घ्यावे एमआरपी पेक्षा जादा दराने कोणी विक्री करत असेल तर तातडीने प्रशासनाला किंवा किसान मोर्चा कार्यालयात संपर्क साधावा. जेणेकरून संबंधितांच्या विरोधात योग्य ती कारवाई करता येईल.  कोरोणाच्या पार्श्वभूमीवर बी, बियाणे व खते खरेदी करताना शेतकरी गटामार्फत निविष्ठा खरेदी कराव्यात. जेणेकरून बाजारांमध्ये होणारी गर्दी कमी होईल. त्यासोबतच शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च देखील वाचू शकेल. शेतकऱ्यांनी साधारणता 75 ते 100 मी मी  इतका पाऊस झाल्यानंतरच पेरणी सुरुवात करावी. पेरणीपूर्वी बी बियाणे बुरशीनाशक व जैविक संघाची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकाची बीबीएफ पेरणी यंत्राच्या साह्याने पेरणी केली जावी. असे आवाहन यापूर्वीच करण्यात आले आहे. सोयाबीन पिका बाबत शेतकऱ्यांनी घरचे योग्य बियाणे पेरणीसाठी वापरावे. हे करत असताना त्या बियांची उगवण क्षमता तपासून घ्यावी. उगवण क्षमता चांगली असल्यास अर्थात 70 टक्के असल्यास एकरी 30 किलो बियाणे पेरावे. उगवण क्षमता त्यापेक्षा कमी असेल आणि 60 टक्के पेक्षा जास्त असेल तर एकरी 35 किलो बियाणे पेरावे. जर त्याची उगवण क्षमता 60 टक्के पेक्षा कमी असेल तर ते बियाणे पेरणीसाठी वापरू नये. अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी यांच्या वतीने देण्यात आली आहे. या सूचनांचे पालन करत असताना कोणीही शेतकऱ्याची फसगत करू  नये.शेतकर्‍यांनी थोडा  जरी संशय आला तर, तात्काळ प्रशासनाची संपर्क साधावा. असे आवाहन किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण फुलारी यांनी केले आहे. अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार जर कोणी स्वार्थी व्यापारी करत असेल तर, त्याची धिंड काढून त्याचा परवाना रद्द करण्यासाठी शासन दरबारी आंदोलन करावे लागेल. असाही इशारा फुलारी यांनी दिला आहे.