स्वच्छता 
स्वच्छता 

 

             स्वच्छतेचे जीवनात फार महत्त्व आहे. स्वच्छता शरीराची असो की परिसराची रोजच करावी. स्वच्छतेने शरीराचा मळ निघून जातो. त्वचेवरची रंध्रे मोकळी होतात. त्यातून वायूंचे चलनवलन होते. शरीर स्वच्छ असेल तर आपण रोगांना बळी पडत नाही. वेळोवेळी सॅनिटायझरने किंवा डेटॉलने हात धुतले की आरोग्यास धोका होत नाही. कारण हात निर्जंतूक केल्याने हातावरील जंतू नष्ट होतात नि रोग होण्याचा संभव टळतो.

             हल्ली कोरोना नावाचा नवीन विषाणू मनूष्याच्या मुळावर येऊन बसला आहे. तो संसर्गजन्य असल्यामुळे हात तसेच संपूर्ण शरीरच स्वच्छ करणे नित्याचे होऊन बसले आहे. घरा अंगणाची स्वच्छता म्हणजे देवी लक्ष्मीचे आगमन.स्वच्छ, सुंदर घरातच लक्ष्मीमाता वास करते. घर धनधान्य, संपत्तीने भरते हे परंपरेने समजले जाते. त्यामुळे सण सोहळ्यापूर्वी गृहिणी घराची स्वच्छता आरंभतात.घरांची रंगरंगोटी केली जाते. अंगणे सडा-सारवण करून चमकवले जाते. रांगोळीने सजवले जाते. घरातील पिण्याच्या पाण्याची भांडी वेळोवेळी घासून स्वच्छ केली जातात. कारण पाण्यातून विषाणूंचा प्रवेश होऊन अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.पूर्वी गावात सुलभ शौचालये नसत त्यामुळे नदी,ओढ्याकाठी घाणीचे साम्राज्य असे.त्यामुळे उंदीर,घूशी,घरमाशा,डास यांचा अतिशय उच्छाद असायचा. सगळीकडे मलेरिया,फ्ल्यू,कावीळ,कॉलरा अशा रोगांचा प्रादूर्भाव असायचा.हल्ली गावातील घराघरांत शौचालयाची सोय केल्यामूळे पर्यावरण थोड्या अंशी साफ दिसते.परंतू जागोजागी पाण्याची डबकी रोगजंतुंचा शिरकाव करण्यास अनुकूल असतात.तेव्हा प्रत्येक नागरिकाची आपला गाव,परिसर स्वच्छ राखण्याची जबाबदारी असते.

           आपल्या वैयक्तिक स्वच्छतेने जसे शरीर निर्मळ, ताजेतवाने होते. घर-अंगण ही सुशोभित होते, तशी स्वच्छता हरेकाने परिसराची केली तर तोही स्वच्छ, निर्मळ होईल. आपणास कचराकुंडी जवळून जाताना नाकाला रुमाल लावावा लागणार नाही. काही लोकांना घर साफ करून कचरा खिडकीतून बाहेर फेकण्याची वाईट सवय असते. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास तर होतोच. परंतु दुर्गुणांचा समावेशही होतो.त्यामुळे कचराकुंड्या, सार्वजनिक शौचालय नेहमी स्वच्छ असावे. तर देश स्वच्छ राखण्यात आपला हातभार असेल. यामुळे जगात देशाचा नावलौकीक वाढेल. अशिक्षित असणारे गाडगेबाबा हाती खराटा घेऊन दिवसभर गाव स्वच्छ करत. त्यामुळे ते पाहून गावकरीही त्यांच्या साह्यास जात. एक अज्ञानी अवलिया कुठूनतरी येतो नि आपला गाव साफ करतो.संध्याकाळी कीर्तनातून मनही साफ करतो. त्याला जे ज्ञान होते ते आपणासारख्या उच्चशिक्षिताला नसावे का?

           हल्ली 'वापरा नि फेका' अशा वस्तूंचे उत्पादन वाढले आहे.एके काळी एकच पेन वर्षभर वापरला जायचा.आता दोन दिवसाला एक पेन अशा हिशोबाने फेकलेल्या पेनांचा कचराच जास्त साठतो.पुर्वी एकच  इंजक्शन उकळत्या पाण्यात टाकून निर्जंतुक केले जायचे नि सर्व रूग्णांना तेच वापरले जायचे.आता प्रत्येक रूग्णास वेगळे इंजक्शन वापरून ते कचराडब्यात फेकले जाते.अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीचा अनिर्बंध वापर झाल्याने साठलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे हा यक्षप्रश्न मानवापुढे उभा आहे.काही गोष्टींचा पुनर्वापरही होत नाही त्या जाळल्या तर हवेचे प्रदूषण होते नि ते आरोग्यास घातक आहे.

        लहान मुलांना बालपणापासून स्वच्छतेची सवय लावणे पालकांचे परमकर्तव्य असते.तीच सवय त्यांना आयुष्यभर पुरते. लोकं रेल्वे किंवा  बसने प्रवास करत असताना शेंगा भेळ किंवा काही असे पदार्थ खातात नि टरफले किंवा कागद  रेल्वेच्या खिडकीतून बाहेर टाकतात. त्यामुळे आपले गैरवर्तन तरी दिसतेच पण परिसरही घाण होतो. काही लोक पाणी पिऊन पाण्याच्या बाटल्या बाहेर टाकतात. पण अंधारात त्या बाटल्यावरून घसरून बाईकवाले नाहक आपला जीव गमावतात. देवाने आपणास बुद्धिप्रधान बनवले आहे. काम करायला हात, पाय,नि संवेदनाशील डोळे, कान असे असताना सुंदर मानवी जीवन जगण्याऐवजी पशूसम जगण्यात काय अर्थ?. माणसाने माणसासारखे वागले तरच त्या बुद्धीचा कस नाहीतर त्यांची वर्णी पशूतच होणार हे ध्यानात घ्यावे.

 

सौ भारती सावंत

मुंबई