बालकांच्या बालमनाचा कानोसा घेणारी कविता :थेंबफुले
बालकांचे बालविश्व घडविण्याचे काम करणारा हा कवी एकनाथ डुमणे हे शिक्षक आहेत. मुखेड तालुक्यातील सावरगाव ही त्यांची जन्मभूमी आहे. थेंब फुले हा त्यांच्या बालकविता संग्रह आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी लेखनविषयक उपक्रम सतत राबविणारे उपक्रमशिल शिक्षक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मुलांच्या मनात शब्दांची पेरणी करणारा हा कवी सतत आपल्या शालेय मुलांत रममान होऊन त्यांच्या अंतरंगाचा ठाव घेत शब्दांचे दिवे लावतो. या संग्रहात छत्तीस ह्या वेगवेगळ्या विषयांवर कविता असून विशेष म्हणजे कवितेत ग्रामीण शब्दांचा गंध दरवळतो. त्यांच्या इशारा कवितेत गडगडाट करत विजेचा थैमान घालणा-या मुसळधार पावसांचे वर्णन केले आहे.
आभाळात आले
दाटून मेघ
मध्येच दिसली
विजेची रेघ
वीज चमकत
इशारा करते
आभाळी बसून
म्हातारी दळते
लहान मुलांना आभाळ गडगडाय लागले की, हा आवाज कोण करीत असेल असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आभाळात म्हतारी दळत आहे असे मुलांना ही सांगितले जाते. घरातली मनीमाऊ म्याँव म्यँव करित दूध कशी फस्त करते आईकडून ती मार खाते. कवी टपोरे टपोरे थेंबांना फुले समजाय लागतो. हातावर थेंब झेलून तो पकडतो पण ते विरघळतात, नाहीशी होतात. हा थेंब गेला कुठे त्याचा शोध घेत हा बालमनाचा कवी जातो.
थेंब फुले
होती जमा केली
दिसेनाशी झाली
सांगा कुठे गेली?
मुलांना विनोदी कविता खूप आवडतात. आणि त्या कविता बालक कधी विसरत नाही. अशीच एक बोकड आणि माकड या दोघातला संवाद विनोदी शैलीत लिहलेली आहे.
एक होता माकड
त्याला भेटला बोकड
माकड म्हणाला हूप्प
बोकड म्हणाला चूप्प
दोघांची तवा
बाचाबाची झाली
तशीच तक्रार
कोर्टात गेली
मुलांना खेळवत ठेवणारी ही कविता मुलांना ही भावते. शहाणी मुले या कवितेतून कवी आईने मुलांवर केलेला संस्कार तसेच मुलांनी काळजी कशी घ्यावी हे कवी लिहितो.
घासायचे दात
स्वच्छ छान
अंग पुसायचे
उरकता स्नान
सांगू या गोष्टी
म्हणू या गाणी
बाई म्हणतील
मुले शहाणी
कुणाला काय म्हणतात आणि नाते कसे असते हे नाते या कवितेतून कवी उजळणी करतो. तर आजी म्हणलं की, नातवाची खुपच आवडती. गप्पागोष्टी करण्यात खूप ती पटाईत असते. आजी चे तोंडभरून कौतुक कवी करतो.
माझी आजी
करते भाजी
पाल्यापासून
ताजी ताजी
जसा आजीवर जिव्हाळा तसाच बालकांचा त्याच्या शाळेवर असतो.
सुंदर छान
आमची शाळा
चिवचिव चिमण्या
झाल्या गोळा
घोडा, चिवडा, डॉक्टर मामा, सोबती, सुट्टी, चांदोबा, कोंबडा, बगळ्यांची फुलं ह्या कविता खूप वाचनिय आहेत.
कुतूहलाचा विषय हा मुलांना खूप आवडतो. पशू प्राणी यावर खूप जीव लावतात. जंगलात प्राण्यांची सभा भरते आणि एकच धम्माल मस्ती होते
अध्यक्षाचा दिला
गाढवाला मान
खुशीत गाढवाने
उभारले कान
बसले गाढव
खुर्चीवर चढून
खुर्ची च तेव्हा
गेली मोडून
छोट्या छोट्या कविता ह्या मोठा आशय देउन जातात. केवळ मनोरंजन नसून मुलांना प्रेरणादायी व प्रबोधन ही करतात. साध्या सोप्या भाषेत कविता असल्याने मुलांच्या लक्षात राहतात. आणि हेच वैशिष्ट्ये कवी एकनाथ डुमणे यांच्या बालकवितेत आहे. अतिशय छान असे आतील चित्र व मुखपृष्ठ स्व.प्रमोद दिवेकर यांनी रेखाटले आहे. तर दादासाहेब जगदाळे यांनी उत्तम निर्मिती केली आहे. त्यांच्या पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा!
प्रा. रामदास केदार
९८५०३६७१८५
थेंब फुले
एकनाथ डुमणे
तेजश्री प्रकाशन
किंमत -५०