बालपणातील आनंदाचा उत्सव साजरा करणारी कविता : लपाछपी



बालपणातील आनंदाचा उत्सव साजरा करणारी कविता : लपाछपी*

 


बालकांच्या बालमनातील अंतरंगाचा शोध घेत आनंदाचा उत्सव साजरा करणारी बाल कविता म्हणजे कविता मेंहंदळे यांचा लपाछपी हा कवितासंग्रह आहे असे मला वाटते. 

     पुणे येथील प्रसिद्ध कवयित्री कविता मेंहंदळे यांची १६ पुस्तके बालवांडःमयाची प्रकाशित झाले आहेत. सोनचाफा, मी मुंगी झाले होते ,लल्ली ,नाचरा निसर्ग ,जिगरी दोस्त, सफर कँडबरी वल्डची हे बालकथा संग्रह. निनाद दीर्घ कथासंग्रह, फुलांची परडी, गट्टी गोष्टींशी हे किशोर कथासंग्रह. धुमधमाल गोष्टी, शंभरावी हे कुमार कथा संग्रह. भरारी, सांगू का कानात? हे बालकविता संग्रह. खोडी माझी काढाल तर हे बालनाटिका इत्यादी बाल साहित्याची पुस्तके प्रकाशित झाले आहेत. तर माप ओलांडल्यावर, अथांग, घरकुल, तिने होकार देताना, निसर्गधून हे कथासंग्रह. भावमुक्ता, उमलतांना, जमाना बदलतांना, ज्याअर्थी -त्याअर्थी, मनाचा किनारा, चांदण चाहूल, माझं जग एवढसं आहे, निसर्गाच्या,, सोबतीने, शब्दांच्या पलिकडे हे ललित लेख संग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित झाले आहेत. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे च्या कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या साहित्य लेखनास अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत .

           मुलांचे भावविश्व रंगवणारे साहित्य लेखन करणे हे खूप अवघड आहे. त्यांच्या मनाच्या कप्प्यात प्रवेश करून ज्ञानरुपी, संस्काररुपी अत्तर दरवळत ठेवणे हे काम अवघडच असते. कवयित्री ही बाल मन जागृत करून बालकांच्या मनातील आनंद साजरा करु पाहते आहे. मुलांना स्वप्नांच्या दुनियेत सफर करावी वाटते. चमचमणारी रविकिरणे मला कोड्यात टाकत आहेत. बर्फाचा पर्वत, हिरवा डोंगर, घनदाट झाडी, खारा वारा हे स्वप्नांच्या दुनियेत मना कसे भूरळ घालत आहेत.या स्वप्नांच्या दुनियेत झेप घ्यावी वाटते. हा बालकांच्या मनात होणारा आनंद कवयित्री बालकवितेतून टिपते आहे. 

 

पर्वत हा बर्फाचा 

उघडमीट डोळ्याचा 

झोका हिरवा निळसर 

घनदाट झाडीचा 

लखलखते त्या मधून 

नागमोडी झरणी झरी 

झेप घेऊ दे मला 

निळ्या निळ्या अंबरी 

स्वप्न पंख माझे 

मोरपिशी सोनेरी 

 

फुलांचे जीवन हे एकच दिवसाचे असले तरी तो आपले कर्तव्य पार पाडत असतो. तो फुलतो, सुगंध देतो, इतकेच काय तर आपल्या भोवतालच्या परिसराला सौदर्याची झालरं देतो. एका दिवशी ते इतके काही करु शकते. आपल्याला भरपूर दिवस आहेत. आपले कार्य ही फुलांसारखे असावे असे कवयित्री ला वाटतं असावे 

 

दंवभरल्या पहाटेला 

एक कळी उमगली 

पाकळी पाकळीतून 

गोड गोड हासली 

 

उमगलेल्या पाकळीचे फुल होऊन दुस-या दिवशी कोमेजून जाते. जीवनच एका दिवसाचे या कवितेतून कवयित्री लिहिते. तर कवयित्री खेड्यातील आपल्या घरांची ओळख करून देते. आज घराला अंगण नाही. अंगणात खेळणारी,बागडणारी  मुलं नाहीत. सडा सारवण आणि लेप दिलेल्या चुली नाहीत पण कवयित्री आपल्या आठवणी जागा करते. आता अंगणातील रागोळी नाही. मात्र कवयित्री चे घर या गोष्टी ने संपन्न आहे. माड्या आणि जिने असलेल्या घरात खेळायच कधी कधी लपाछपी. माझे खेड्यातील घर आदरतिथ्याच आहे असे लिहिते. 

 

खेडेगावातलं घर माझं 

शेणाच्या सारवणाचं 

सुबकशा रांगोळीचं 

आल्या -गेल्याचं हक्काचं 

प्रेमळ आदरतिथ्याचं.... 

 

एखाद्या फळांचे, पक्षांचे, वस्तूंचे, राहणीमान, या वरुन त्या गावची ओळख होते पण आपल्या या महाराष्ट्रात पुस्तकांचे गाव म्हणून महाबळेश्वर जवळील भिलार या गावची वेगळी ओळख आहे. प्रत्येक घरात पुस्तके पहावयास मिळतात. तेही मोफत वाचण्यासाठी. या ज्ञानाने संपन्न व थंडगार आणि टुमदार गावची ओळख कवयित्री मुलांना करून देते आहे. महाराष्ट्रात असे एक गाव आहे की तीथे स्टाँबेरीचे मळे आहेत. निसर्ग सौंदर्याने नटलेले हे गाव शिवरायांच्या मावळ्यांचा इतिहास घेऊन वाई पाचगणीच्या रांगेमधी दिमाखाने उभा आहे. 

 

निसर्गाच्या सौदर्याची 

साद येई बारामास 

नाही कमी पुस्तकांंची 

वैचारिक, इतिहास.. 

 

गाव हेच ते भिलार 

ओढ लागे अनिवार 

रस्ता महाबळेश्वर 

होई नवीन विचार 

 

शेतक-यांनी पेरलेल्या बियाला कष्टांच फळ मिळाले की तो आनंदून जातो. खूप खूप पिकलं की त्याला नवलं वाटणं साहजिक आहे. लहान मुलांना ही असेच नवल वाटणे साहजिकच आहे. एका दाण्यांपासून हजार दाणे झाल्यांचा आनंद शेतक-याला कसा होतो हे कवयित्री लिहिते. 

 

काय सांगू या भूमीत 

देवा नवाल घडलं 

एका इवल्या बीजाचं 

हज्जार दाणं झालं 

 

दिमाखात सुगी आली 

शिवार हळदुलं झालं 

घाम गाळून कापणी 

झोडणीत सांजावलं 

 

निसर्गाची जादू खूप वेगळी असते. पाऊस ,पाणी ,ऊन ,वारा झाड ,वेली ,चंद्र सूर्य यातूनच माणसाला नवचैतन्य निर्माण कसे होते हे कवयित्री मुलांना ओळख करून देते. 

 

झरझर झरझर जलधारा 

अवचित वरुन आल्या 

घरें पाखरें ,झाडे झुडपे 

वाटा ओल्या झाल्या 

 

आकाशातील पाहून उधळण 

मन हरवून गेले 

निळे -मोकळे -स्वच्छंदीपण 

डोळ्यांमध्ये भरले. 

 

शाळेची मधली सुट्टी ही सगळे एकत्र असण्याची असते. या मोकळ्या वेळात गणीत, रसायन, मुळाक्षरे, खेळ, हे सगळं विसरत नाही अशी शाळेची मधली सुट्टी असते. 

 

गिरविली मुळाक्षरे 

खजिना ज्ञानाचा 

इथेच मिळाला धडा 

मैत्रीचा -मुक्त खेळीचा

मना मनाला सांधणारी 

शाळेची मधली सुट्टी! 

 

पावसांच्या आगमनाने ही पृथ्वी नटते. पशू प्राणी यांच्या आनंदाला उधाण येते. झोपाळ्यावर फुले डोलू लागतात तर हिरव्या पानात कोकिळ बोलू लागतात. 

 

अमृत थेंब हळूवार उतरले 

भान अवनीचे पुरे हरपले 

आदंदाने मन नाचू लागले 

पावसाने... 

 

गंध मातीचा, गंध फुलांचा 

लेऊन संग, हिरव्या स्वप्नांचा 

पोपटी साज झळाळीचा 

पावसांने... 

 

लपाछपी म्हणजे लपंडाव. हा लपंडाव ऊन सावली, कडकडाट करित येणाऱ्या वीजा, ढगाआड आड जाणाऱ्या सुर्याचा ,सात रंगाची उधळण करणा-या इंद्रधनू चा तर कधी झाडांच्या  हिरव्या गर्दीत पाखरांचा तर अधून मधून येणाऱ्या पावसांचा लपंडाव खेळ असतो. तर कधी मुलं ही भान हरपून हा लपाछपी चा खेळ खेळत असतात.या खेळातून वाटणारा आनंद मुलं साजरा करीत असतात. निसर्ग ही असाच खेळ खेळतो. 

 

खेळ प्रकाश किरणांचा 

लपंडाव जलधारांचा 

इंद्रधनुच्या कमानीचा 

चकीत माझ्या डोळ्याचा 

 

कवयित्री कवितेतून निसर्ग, पशू ,पक्षी ,प्राणी, नदी नाले, डोंगर द-या, शेती ,माती ,शाळा, गुरु शिष्य  याचा उलगडा केल्यांचे दिसते. मुखपृष्ठ आणि आतील चित्रे चिन्मय लेले यांनी रेखाटले आहेत. त्यांच्या पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा! 

 

  प्रा. रामदास केदार 

  ९८५०३६७१८५

लपाछपी 

(बालकविता)

कविता मेंहंदळे 

नीहारा प्रकाशन, पुणे 

पृष्ठे ६४ , मुल्ये ६० रु.