मुलांसाठी आदर्श विचार :  - अण्णाभाऊंची वाणी समतेची गाणी

मुलांसाठी आदर्श विचार :  


अण्णाभाऊंची वाणी समतेची गाणी



समतेचा आणि क्रांतींचा विचार पेरत जाणारी बालकुमारांसाठीची आदर्श गाणी लिहून कवी अंकुश सिंदगीकर व सतीश नाईकवाडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याचा विचार बालकुमारांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केलेला आहे. 
     अण्णाभाऊंची वाणी समतेची गाणी या गीत संग्रहात अंकुश सिंदगीकर, सतीश नाईकवाडे या दोघांची मिळून ३० गाणे आहेत. दोन्ही ही कवी लातूर जिल्ह्यातील असून अंकुश सिंदगीकर हे जळकोट तालुक्यातील केकतसिंदगी तर सतीश नाईकवाडे हे चाकूर तालुक्यातील उजळंब या गावचे आहेत. अंकुश सिंदगीकर यांचे कागदावरची पोट, स्वस्त झालं मरण कविता संग्रह .लहुजी साळवे आणि मातंग समाज हा वैचारिक ग्रंथ. गंधरव हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने शासनाचा विशाखा हा महत्त्वाचा काव्यपुरस्कारासह इतरही सन्मान प्राप्त झाले असून शाहीर म्हणून सिंदगीकरांची ओळख आहे. तर दुसरे कवी सतीश नाईकवाडे यांचे घाव, सखा माझा अण्णाभाऊ, डोळे माझे सूर्य झाले हे कविता संग्रह प्रकाशित झाले असून त्यांच्याही कार्याचा सन्मान करण्यात आला आहे. 
         लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची सगळीकडे जन्मशताब्दी उत्सव साजरा केला जात आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ओळख नाही असा कोणताही बालक बोलू शकत नाही एवढे महान कार्य आणि विचार त्यांचे आहेत. पण काळानुसार त्यांचे समतेचे आणि क्रांतीचे विचार लहान बालकुमांरांच्या समोर ठेवणे ही आजची गरज आहे असे कविला वाटत आहे. अण्णाभाऊ साठे यांचे जीवनचरित्र खूप मोठे आहे. साहित्य लेखनही खेप मोठे आहे. पण आपले एक कर्तव्य समजून मुलांसमोर त्यांचे अनमोल विचार गाण्यांच्या माध्यमातून ठेवण्यांचा छोटासा प्रयत्न खूप मोलाचा ठरतो आहे. कारण आज शाहू, फुले, आंबेडकर, लहू यांच्या विचारांची गरज आहे. वंदन गीतातून कवी अण्णाभाऊ च्या आईची ओळख करून देतो आहे. 


वाटेगावी अवतरला हिरा 
भाग्याची अशी ही लीला 
वालु आईच्या तू नंदना 
गातो पहिल तुला वंदना.... 


हा गुणी पुत्र दीनदलितांसाठी संघर्ष करतो आहे. समाज सेवेचा पाईक होतो आहे. आपला देह चंदना सारखा झिजवून समता आणि ममतेचा खरा मार्ग तू दाखवलास तोच खरा मार्ग आता मुलांनी स्विकारला पाहिजे असे सिंदगीकरांना वाटते. दीड दिवसाचं शिक्षण शिकलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी रशिया येथे आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. 


लहान मुर्ती महान किर्ती 
दलितांचा कैवारी शोभतोय ग
दिड दिवसाचं शिक्षण ग
स्वाभिमान आमुचा जागतोय ग... 


अनेक पुस्तके लिहून अण्णाभाऊंनी साहित्य विश्वात ही उंची गाठलेली आहे असे कवी सांगतो. तर जगाला मोठे तत्व त्यांनी शिकविले आणि आपल्या शब्दातून क्रांती घडविली असे सिंदगीकर लिहितो. 


शब्दातून घडविली क्रांती 
देशाला देण्या शांती 
अण्णाभाऊ नी शिकविले 
तत्व जगाला महान 
शिकविले स्वाभिमान..... 


अण्णाभाऊ च्या पाळणा गीतातून सतीश नाईकवाडे यांनी बालपण ते भाऊंचा शेवटचा प्रवास खूप छान शब्दात मांडलेला आहे. नाईकवाडे लिहितात. 


गावोगावी जत्रा चाले जोमात 
दांडपट्टा अण्णा चालवी वेगात 
गिरणीत कामगार झाला 
कामगारांचा लढा उभारला 


भीमविचाराची कास धरुन 
फकिरा भीमाला केली अर्पण... 


अण्णाभाऊंची लेखणी म्हणजे धारदार तलवारच होती. शब्दाशब्दाने वार करत अंधश्रद्धेला मातीत गाडणारा अण्णाभाऊ ची वाणी म्हणजे मानवतेची खरी गाणी होती असे कवी म्हणतो. 


अण्णा तुझी वाणी 
मानवतेची गाणी 
समतेची पेरणी 
तुझी लेखणी... 


अण्णाच्या वाट्याला संघर्ष खूप मोठा होता. पोटाच्या खळगीसाठी मुंबईची वाट धरावी लागली. आणि पुढे संयुक्त महाराष्ट्र लढ्यासांठी आपली लेखणी आणि काया झिजवली. पहाडा सारखा आवाजातून अण्णांनी या महाराष्ट्राच्या मायभूमीची थोरवी पोवाड्यातून गायली ही खरी अण्णाभाऊ ची ओळख आहे असे सतीश नाईकवाडे लिहितो. 


पहाडी आवाज तुझा 
गगनाशी भिडला 
मराठी माणूस 
घराबाहेर पडला 


महाराष्ट्राची राजधानी 
झाली ती मुंबई 
शाहिरीची तुझ्या 
हीच नवलाई.... 


जातीवाद्यांना जीवंत जाळलं पाहिजे. माणूस हाच एक खरा धर्म आणि खरी जात आहे असे कवी नाईकवाडे यांना वाटते. माणूसकी चा खरा धर्म कवी मुलांना सांगतो आहे. हे दोन्ही कवींच्या गीतातून सूर उमटतो आहे. 
         गुलामात अडकलेला मातंग समाज हा भरकटलेल्या अवस्थेत असताना मोर्चा च्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढलेला लढा हा इतिहासाच्या सुवर्ण अक्षराने लिहिला गेला. आणि म्हणून कवी आता तरी जागे व्हा अशी हाक ही देतो आहे. मुलांनी जयंती साजरी करुन नुसते बसण्यापेक्षा त्याचे विचार प्रत्येक मुलांनी आत्मसात केले पाहिजे हा विचार गाण्यांच्या माध्यमातून कवी ठेवतो आहे. विषमतेचा वारा देशभर वाहत असताना समतेचा झेंडा आपण हाती घेऊन अण्णाभाऊ सारखं दीनदलित, शोषित सामान्य समाजासाठी उभे राहिले पाहिजे हा संदेश हे कवी देऊ पाहतात. 
       अण्णाभाऊंची वाणी समतेची गाणी या गीतसंग्रहातून अण्णाभाऊंचे बालपण, संघर्ष, चळवळी, लढा, शाहिरी, पोवाडे, साहित्य लेखन, कामगार चळवळ, मोर्चा, महाराष्ट्र लढा  इत्यादी बाबीवर प्रकाश टाकला आहे. केवळ बालकुमारांनीच अण्णाभाऊ चा आदर्श न घेता युवा पिढीला ही ही गाणी प्रेरणादायी ठरणारी आहेत. साध्या कुटूंबातील जन्माला येणारा माणूस हा आपले नाव जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरतो आहे. असे आपणही ही कार्य करावे. असा मोलाचा संदेश कवी देतो आहे. 
       मुलांना सहज ही गाणे गाता यावे अशी ही साधी आणि सोपी भाषाशैलीत गीतांचे लेखन केले आहे. अण्णाभाऊ च्या समतेचा विचार मनात मुलांच्या पेरण्याचा हा छोटासा प्रयत्न मोलाचा नक्कीच ठरणारा आहे. हे सर्व गाणी संगीतमय झाली तर अनेक वर्षे मुलांच्या मनात घर करून बसतील. या दोन्ही कवी गीतकारांच्या पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा! 


          प्रा. रामदास केदार 
          ९८५०३६७१८५


अण्णाभाऊंची वाणी 
समतेची गाणी 
अंकुश सिंदगीकर 
सतीश नाईकवाडे 
उपासना प्रिटर्स, उदगीर 
पृष्ठे ३४ मुल्ये ५० रु.