*निसर्ग कागदावर बोलके करणारे चित्रकार -काशिनाथ गावित*

निसर्ग कागदावर बोलके करणारे चित्रकार -काशिनाथ गावित



आकाशाच्या छत्राखाली असणाऱ्या सर्व गोष्टी खूप अद्वितीय आहेत.सुर्य आपल्या किरणांनी सृष्टीला नटवीत असतो.  वेगवेगळ्या ऋतूंमध्ये होणारा ऊन पाऊसांचा खेळ, सूर्योदय व सूर्यास्तामध्ये ढगात दिसणारे दृश्य,काही ठिकाणी धुके तर कधी कधी ढगाळ वातावरणात निसर्गाची तयार होणारी अनोखी रुपे चित्रकारांना खुणवीत असतात.
     आपल्या दृष्टीस पडणाऱ्या निळ्या, हिरव्या रंगाच्या असंख्य छटा मनाला विलक्षण आनंद देतात.पिवळ्या रंगांचा तजेलदार पणा असो किंवा तांबड्या रंगाचा ठसठशीतपणा, गुलाबी रंगाची मोहकता, जांभळ्या रंगाचे ऐश्र्वर्य, असे असंख्य रंग चित्रकारांना भावतात.यातूनच शोभिवंत सृष्टी निर्माण करण्यासाठी कुंचल्यातून साकारलेली कलाकृती म्हणजेच निसर्ग चित्र होय...
    पावसाळ्याची चाहूल लागली, की निसर्गप्रेमींची पाऊले, दुर्ग,नद्यां व डोंगरदऱ्यांच्या दिशेने वळतात. कधी रिमझिम पडणाऱ्या सरी, तर कधी भिती वाटावी एवढा कोसळणारा पाऊस प्रत्यक्ष अनुभवण्याची  मजा काही औरच असते. हिरवा शालू पांघरलेल्या या डोंगरदऱ्यांच्या कुशीत जाऊन मोकळा श्वास घेण्याची संधी कोणीच दवडत नाही.अशी नयनरम्य दृश्य आपल्या मोबाईल च्या माध्यमातून फोटो शुट करुन किंवा आऊट डोर ला जाऊन चित्रकार निसर्ग चित्र रेखाटत असतात.
     चित्रकार काशिनाथ अर्जुन गावित यांचा जन्म १५ आॅक्टोबर १९८४ रोजी कळवण तालुक्यातील निरगुडपाडा या लहानशा खेड्यातील आदिवासी कोकणा समाजातील एका गरीब कुटुंबात झाला.लहानपणापासूनच निसर्गात बागडताना निसर्गाची आवड निर्माण झाली.वाचन व पोहण्याचा छंद जडला.सतत लाभलेले निसर्गाचे सान्निध्य , निसर्गाची सततची जवळीक यामुळे आपसुकच मनात निसर्गाबद्द्ल ओठ निर्माण झाली.
यांनी प्राथमिक शिक्षण तालुक्यातच पूर्ण केले.
पुढील शिक्षणासाठी कलाक्षेत्र निवडले. शिवशंकर चित्रकला महाविद्यालय कळवण येथे ए.टी.डी,ए.एम  तर सी टी सी व जी डी आर्ट द्वितीय वर्ष पर्यंतचे शिक्षण नाशिक येथे  पूर्ण झाल्यानंतर नोकरी च्या शोधात असताना फेब्रुवारी २००९ मध्ये जिल्हा परिषद प्रशाला परसोडा ता.वैजापूर जिल्हा औरंगाबाद येथे त्यांना गुणवत्तेच्या आधारावर नौकरी मिळाली.एका सामान्य कुटुंबात शिक्षण घेऊन नौकरी मिळणे हे आनंद शब्दात वर्णन करणे कठीण आहे.
    या कलाकारांचा जन्मच निसर्गाच्या सेवेसाठी झाला असावा, असे वाटते.त्यांचा ब्रश आणि रंग हे निसर्गाशी संवाद साधत कागदावर निसर्ग आपल्या भावभावनांची देवाण घेवाण जणू करीत आहेत, असे भासते.
      निसर्ग सौंदर्य कुंचल्याने चित्रबद्ध करणारे काशिनाथ गावित हे जलरंग माध्यमातील पारदर्शक रंग, अपारदर्शक रंग तसेच अॅक्रेलिक व तैलरंग आदीचा समर्थपणे वापर करत यांनी आजवर शेकडो चित्र काढले आहेत.
    निसर्गातील नदी,किल्ले, हिरवे हिरवे डोंगर, वळणदार रस्ते, धबधबे, मंदिरे,ग्रामीण भागातील निसर्गाचे वास्तवादी चित्रण यांच्या निसर्ग चित्रात पहावयास मिळतात.
    शाळेतील फलकावर दिनविशेषानुसार चित्र रेखाटन व लेखन करणे,शाळेच्या बोलक्या भिंती, विविध कला स्पर्धा, विद्यार्थ्यांना कलेबद्दलचे मार्गदर्शन या कार्यातून तालुक्यात विशेष ओळख निर्माण झाली आहे.
   सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हास्तरीय शिक्षणोत्सवात शिक्षकांना कलेबद्दल मार्गदर्शन, प्रतिवर्षी शाळेत चित्र प्रदर्शन, वृत्तपत्रांमधून विविध कला विषयांवर बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, यासाठी गावित सर औरंगाबाद जिल्ह्यातील एक उपक्रमशील कला शिक्षक म्हणून ओळखले जातात.
    जिल्हा शिक्षक संघटनेच्या वतीने व सानेगुरुजी पतसंस्था वैजापूर च्या वतीने उत्कृष्ठ कलाशिक्षक पुरस्कार देऊन यांना सन्मानित करण्यात आले.निसर्ग चित्र रेखाटनातून सर्व कलाकार कलाप्रेमींच्या मनात स्थान मिळवले आहे.चित्रकार गावित यांना कलात्मक प्रवासासाठी शुभेच्छा!


              महादेव शरणप्पा खळुरे
        यशवंत विद्यालय अहमदपूर
        मो ८७९६६६५५५५