चैतंन्याची शब्दफुले:आम्ही गोजिरी मुले*





चैतंन्याची शब्दफुले:आम्ही गोजिरी मुले*

    


लहान लहान मुले ही फुलपाखरांसारखी आनंदी आणि स्वच्छंदी असतात. आपण जसा त्यांच्या मनावर संस्कार रुजवू तसं ते पुढे घडत असतात. त्यांच्या त्या बाल आणि कुमार मनांचा विचार करून कवी सुभाष किन्होळकर यांनी आम्ही गोजिरी मुले हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. या संग्रहातील कविता ह्या मुलांच्या मनात आनंद, नवचैतन्य निर्माण करणा-या आहेत.संस्काराचे बीज मुलांच्या मनात रुजविण्याचा कविचा प्रयत्न असावा असे मला वाटते.

      बुलढाणा जिल्ह्यातील किन्होळा हे कवींचे जन्म गाव आहे. झळ ही कादंबरी,  मशाल ,रानमेवा कविता संग्रह, गगनगंध ललितलेखसंग्रह, खाऊचे पैसे बालकथासंग्रह, ट्रिंग ट्रिंग, हसत खेळत, आम्ही गोजिरी मुले हे बालकविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. सातवी वर्गाच्या शालेय पाठ्यपुस्तकात त्यांच्या कवितेचा समावेश करण्यात आला असून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 

    कवींची पहिलीच कविता ही राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी आहे. 

  भूमातेचे गाणे गाऊ 

  आम्ही सारे भाऊ 

   उंच उंच नेऊ ध्वज 

   उंच उंच नेऊ 

भारत मातेच्या सदैव सेवेत आपण सगळे राहून स्वातंत्रयाचा हा उत्सव मोठ्या मनाने, आनंदाने साजरा करूया असे कवी म्हणतो. जसा भूमातेचा गौरव कवी करतो तसाच गौरव आपल्या मातृभाषेचा करतो. मराठीतली मधुरता आणि भाषेचा गोडवा सांगतो. 

  मराठीचे बोल 

   काय सांगू ताई 

    अत्तराची कुपी 

     असे तिच्या ठाई 

आईवडील यांचा मान सन्मान राखणे हे आपले कर्तव्य आहे. आपत शिकून शहाणे होत आपण आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे असा सल्ला ही बालकांना कवी कवितेतून देतो. 

       आम्ही गोजिरी मुले 

      हुशार बनू सारे 

     आई बाबा गुरूंचे 

     बनू हासरे तारे 

 

    कुणी बनू चावला 

   कुणी बनू कलाम 

   देशाच्या हितासाठी 

   करत राहू काम 

देशहिताबरोबरच डोळ्यात तेल घालून पहारा करणार्‍या सीमेवरील रक्षकांचेही कवी गुण गातो. 

  मृत्यूचे ना भय तुला 

   मृत्यू असता पुढे 

   शौर्य ऐकुनी तुझे 

    निनादती चौघडे 

   धन्य तू बा शूरवीरा 

    तूच असशी वाली 

   तुझ्यामुळेच साजरी 

   दिवाळी, ईद, होळी 

कवी मुलांना बागेतील फुलांची ओळख करून देतो कवी लिहितो -

    

चला जाऊ बागेत आपण सारे 

पाहूया फुलांचे झुलते तारे

मोग-यांचा सुगंध धुंद करी मना 

बकुळाही गालात हासे पुनःपुन्हा 

 

डाँक्टरांना जात ,पात, धर्म नसतो. तो देवदूत होऊन सेवा करतो. कविंची प्रत्येक कविता ही मुलांना संस्कारांचे धडे देणारी आहे. देशाभिमान, पुस्तकाच्या पानोपानी, कष्टकरी बाप, दुष्काळी गाव मोबाईलचं वेड ह्या कविता वाचनिय आहेत. 

कवी आपल्या कवितेतून मुलांना खरे बोलायला शिकवितो. आपली जीभ आपण आपल्या काबूत ठेवली पाहिजे हा मोलाचा संदेश कवी देतो आहे. मुलांना पाऊस खूप आवडतो. पावसात चिंब चिंब भिजून भिजाव वाटतं. साचलेल्या डबक्यात उड्या माराव्या वाटतात. मुलांना काय वाटतं ते कवी लिहितो. 

 

     अग्गोबा  ढग्गोबा 

     आतुरली मुले 

     पडू द्या चोफेर 

     पावसाची फुले 

     होऊ द्या रिकामे 

     आभाळाचे पोट 

      नाचू द्या आमची 

      पाण्यावर बोट 

काळानुसार विज्ञान तंत्रज्ञान विकसित होत असून परिवर्तनाच्या दिसेने मानव हा पाऊल उचलत आहे. कवींची रोबोट येतोय ही कविता हेच सांगते. 

  थांबा जरासे 

  रोबो येतोय 

  आपले सारे 

  काम घेतोय 

 

  विना मेंदूचे 

  जरीही यंत्र 

  शिकवी आम्हा 

  जीवन तंत्र 

कवी सुभाष किन्होळकर यांनी आपल्या बाल - किशोर कवितेतून सर्व विषयाला हात घातला आहे. विशेष म्हणजे कवींनी  कल्पनेचा धागा न पकडता वास्तविक लेखनाची कास धरली आहे. हे त्यांच्या लेखनाचे वेगळेपण आहे. छान असे जगाला एकात्मतेचा संदेश देणारे मुखपृष्ठ तयार केले गेले आहे. आतिल चित्रेही बोलकी आहेत. मराठी बालसाहित्यात नक्कीच अग्रेसर ठरणा-या कविता आहेत. कवींच्या पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा! 

 

 प्रा. रामदास केदार 

   ९८५०३६७१८५

 

आम्ही गोजिरी मुले 

सुभाष किन्होळकर 

स्टारलेट प्रकाशन, दिल्ली 

किंमत ८८रुपये


 

 




 

Attachments area