चार डॉक्टर व तेरा कर्मचाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह .
उदगीर (जि.लातूर) : गेल्या आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णावर येथील एका खासगी दवाखान्यात उपचार करणारे चार डॉक्टर व तेरा कर्मचाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मंगळवारी (ता.१९) एका पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली असून आता येथील कोरोना रुग्णालयात एकूण सोळा कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीश हरिदास यांनी दिली.
नांदेड नाका परिसरातील आनंदनगर येथील एका ६८ वर्षीय रुग्णास शहरातील एका खासगी रुग्णालयात रक्तदाब, मधुमेह व श्वसनाचा त्रास होत असल्याने दाखल करण्यात आले होते. या रुग्णाच्या परिस्थितीवरून व दिसणाऱ्या लक्षणावरून या खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी या रुग्णास कोरोना रुग्णालयाकडे वर्ग केले होते. या खासगी दवाखान्यातील चार डॉक्टर व १३ कर्मचारी या रुग्णांच्या संपर्कात आले होते. शुक्रवारी (ता.१५) या रुग्णास कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.
त्यानंतर या चार खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना होम क्वारंटाईन तर १३ कर्मचाऱ्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते.
या सतरा जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी लातूरला पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल मंगळवारी (ता.१९) रात्री उशिरा आला असून या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे डॉ.हरिदास यांनी सांगितले. मात्र एक अहवाल पॉझिटिव्ह आला असून आता कोरोना बाधित रुग्णांची संख्याही सोळा झाली आहे. या सोळा जणांवर येथील कोरोना रुग्णालयात उपचार चालू असून सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे. यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक व बाहेरून येणाऱ्या व्यक्तींची दररोज तपासणी करण्यात येऊन त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी लातूरला पाठवण्यात येत असल्याचेही डॉ.हरिदास यांनी सांगितले
हनुमान कट्टा आता नवीन रेडझोन
मंगळवारी (ता.१९) रात्री उशिरा आलेल्या अहवालात येथील हनुमान कट्टा परिसरातील नागमणी गल्ली येथे एक कोरोनाची लागण झालेला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.आता हा परिसर नवीन रेडझोन निर्माण झाला असून लवकरच येथील सर्व मार्ग सील करण्यात येणार आहेत. शिवाय या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी ही करण्यात येणार आहे.
.