सहकार्यांच्या भावनेतून एकतेचा संदेश देणारी बालकविता : गट्टी झाली आहे

 


सहकार्यांच्या भावनेतून एकतेचा संदेश देणारी बालकविता : गट्टी झाली आहे



 


या सुंदर सृस्टीवरती अवती भोवती वावरणाऱ्या सहकार्याच्या भावनेतून एकतेचा संदेश देणारी, कट्टी न करता गट्टी करुन सर्वाना सांभाळून घेणा-या आशयाची कविता गट्टी झाली आहे या बालकवितेतून कवयित्री नीलम मानगावे यांनी लिहलेली आहे. 
            कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील ही कवयित्री असून त्यांची कथा, कविता, कादंबरी, लोकसाहित्य, सामाजिक, वैचारिक, आत्मकथन, बालसाहित्य, कुमार ससाहित्य, संशोधन अशा वेगवेगळ्या विषयांची ६० पुस्तके प्रकाशित झाले आहेत. अनेक वर्तमानपत्रात सदरलेखन लिहिले आहे. महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्याच्या पाठ्यपुस्तकात तर मुंबई, औरंगाबाद विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कवितेचा व इतर साहित्य लेखनाचा समावेश करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या पुरस्कारासह इतर मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. मराठी भाषा साहित्य लेखनात नीलम मानगावे यांचे नाव व कार्य खूप मोठे आहे. कवयित्री लिहिते की, 


मी सा-यांचा सारे माझे 
आमुची गट्टी झाली आहे 
सा-यांचे नाते आता 
पक्के झाले आहे 
असं म्हणणा-या बाल-मित्र मैत्रिणींनो गट्टी होणं आणि ती जपणं,यासारखा आनंद दुसरा नाही मित्र -मैत्रिणींशी गट्टी तर असतेच. पण... हवा, पाणी, पाऊस, प्राणी, पक्षी, डोंगरद-या, झाडं -झुडपं, जंगल, नद्या, समुद्र, चंद्र, तारे, वारे माती आणि नाती या सा-यांशी मैत्री करणं म्हणजेच मैत्रीचा सुगंध घेणं आणि देणंही! आणि हाच खरा जीवनातील आनंद आहे. 


 जगभरातल्या पक्षांचे आहे 
 आभाळाशी नाते 
 म्हणूनच तर भूमीवरचे 
 फिरत राहते जाते 
 आभाळाची अन् मातीची 
 गट्टी झाली आहे 
 सर्वांचे नाते आता 
  पक्के झाले आहे 


धुक्यातील दवबिंदूवर सुर्यांची सकाळी सकाळी किरणे पडू लागली की, ते मोत्यांसारखे चमकत असतात. अशा धुक्यांच्या हातात हात घेऊन मोती वाटत जाऊ पाहणा-यांचे वर्णन कवयित्री सुंदर शब्दात करते.


हातात हात घेऊन दोघं 
बाहेर गेलो फिरायला 
धुकं म्हणालं, चल आता 
जाऊ मोती वाटायला 


आम्ही दोघे हसत हसत 
मोती लागलो उधळायला 
झाडं, वेली, दगड, धोंडे 
सारे लागले हसायला 


पण हाच सूर्य थोडासा तापला की, त्या मोत्याचे पाणी पाणी करुन टाकतो. हिरव्या हिरव्या वेलीवर, गवतावर, पानाफुलांवर सांडलेले हे मोती सुर्याच्या रागाने कसे लोप पावतात हे कवयित्री बाल मनाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे. 


एवढ्यात आला सूर्य त्याने 
मोत्यांचे केले पाणी 
धुकं म्हणालं चल...पळ 
नाहीतर पाहिल कोणी 


गुरुजी एकदा शाळेतील मुलांची सहल स्मशानात घेऊन जायचे ठरवतो. मुलांची बोलतीचं बंद होते. स्मशान म्हणलं की, भूत, हडळ याची कायमची भीती मनात घर करुन बसलेली असते. मुलं भीत भीत जातात. गुरुजी मुलांना म्हणतो. जळाल्यावर या देहाची राख होऊन जाते. हे सगळे कल्पनेचे भारूड आहे.जाताना घाबरत गेलेली मुलं येतांना मात्र निधड्या छातीने परत येतात. मेंदूला खरी जाग येते. अंधंश्रद्धेमुळे अनेकांचा बळी गेला आहे. मुलांच्या मनातली अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न ही कवयित्री कवितेतून करते आहे. 


एकदा आमच्या गुरुजींनी 
स्मशानात सहल काढली 
कोण कोण येणार म्हणताच 
आमची बोबडी वळली 


अभ्यासापेक्षा शिक्षण कसे भन्नाट वाटले हे कवयित्री लिहितांना महापुरांची आठवण करून देते. पाऊस मोठा पडतो .महापुरात घरे दारे वाहून गेल्यावर विसावा शोधत या माणसांना शाळेचाच आधार मिळतो. माणसं शाळेत आणि मुलं घरी. माणसांना मदतीचा ओघ सुरू होतो. माणुसकीचे आणि दानवृत्तीचे खरे दर्शन या कवितेतून आलेले आहे. पूर ओसरतो माणसं फक्त मैत्रीचा धागा बांधून निघून जातात. 


पाऊस सरला.. पूर ओसरला 
सगळे गेले निघून 
पण मैत्रीचा धागा 
जाताना गेले बांधून 


शाळेतल्या या दिवसांनी 
खूप काही शिकवलं 
अभ्यासापेक्षा हे शिक्षण 
भन्नाटच वाटलं 


आकाशात चंद्रांच्या घरी ससा कसा जाऊन फसला आणि तो आमवश्याची रात्री हा ससा कसा नाहिसा झाला ही कल्पक कविता मुलांसमोर ठेवते आहे. 


चंद्रावरचा ससा मला 
खिडकीतून दिसला 
कुणास ठाऊक कसा तो 
आभाळात फसला 


आमवस्येच्या दिवशी 
चंद्र नाही दिसला 
कुणास ठाऊक कुठे 
ससा जाऊन बसला 


आमच्या काहीही चुका नसताना आम्हाला मारलं जातं अशी वाघोबा खंत व्यक्त करतो आहे. विनाकारण कुणालाही त्रास देऊ नये असा सुचक सल्ला मुलांना वाघोबाच्या माध्यमातून कवयित्री मुलांना देते आहे. 
तर सूर्य आपल्या लीला कशा प्रकारे दाखवत असतो.कधी कधी ढगाआड लपतो, काळोखात लपतो, कधी समोर, कधी डोक्यावर तर कधी पाठीमागे तर डोंगराआड लपून बसतो. सूर्याला वाटत असतं की मी भीत्रा आहे. खरं सांगा मित्रानो मी भीत्रा आहे का?मी आहे म्हणून तर तुम्ही आहात. कवियत्री या तेजोधीश सूर्याची ओळख कवयित्री मुलांना करून देते. 


माझ्यासमोर अंधाराचा 
चेहरा हरवून जातो 
त्याचा विठ्ठल जपण्यासाठी 
मी हळू निघून जातो 


सा-यांनाच आता 
मोल माझे कळले 
भित्रा असं पुन्हा 
कुणी नाही म्हटले 


पर्यावरण जपण्यासाठी झाडे लावली पाहिजेत. तर पावसासाठी गाणं गायलं पाहिजे. तेंव्हाच ढगात धडकी सुरु होऊन वीजासकट ढग रडाय लागली म्हणजे पाऊसच पाऊस होईल. आणि ही वने हिरवीगार राहतील असे कवयित्री ला वाटते. 


घाबरलेले ढग मग 
रडायला लागतात 
पाऊस होऊन खाली 
गळायला लागतात 


म्हणून म्हणते दादा 
तुम्ही लावा झाडे 
मी म्हणते गाणे 
झाडांची होतील मग 
हिरवीगार वने 


काही मुलांची झाडाशी गट्टी होते. त्या झाडाच्या हातापायांना धरुन लोबकळत खेळ खेळणारी मुलं झाडांशी बोलायला सांगतात. ढगांशी बोलायला सांगतात. फुलांशी बोलायला सांगतात. झाडांशी मुलांनी गट्टी करावी, मैत्री जपावी असे कवयिला झाडांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते आहे. 


झाडा झाडा डोल डोल 
माझ्यासंगे बोल बोल 
बोललास तर हासेल फूल 
देईल तुला तुझे मूल


झाडा झाडा डोल डोल 
ढगासंगे बोल बोल 
ढगाशी दोस्ती कर 
मग त्याचा हात धर 
हळू हळू खाली ओढ 
मग हळूच हात सोड 
पावसांची लागेल धार 
होऊन जा मग गारेगार 


कवयित्री झाडांशी गट्टी करुन बोलू पहात आहे. वसंत ऋतूच्या आगमनाने झाडाला नवी धुमारे फुटतात. शरद ऋतू लागला की झाडे नागवी होता. घरटे सोडून पक्षी उदासल्या मनाने दूरवर जातात. वसंत आला की झाडांना बहर येतो. कोकिळेचा कंठ दाटून येतो. सुंदर असे वर्णन कवयित्री करते. 


बाबा म्हणाले, शरद ऋतूत 
गळून जातात पाने 
वसंताची चाहूल येता 
हसतात पुन्हा वने 


पुन्हा येतात पक्षी 
घरटी बांधतात नवी डोलायला लागतात झाडं 
आणि कोकिळ होतो कवी 


सूर्य, वेली आणि दरीचा एक गोड संवाद कवितेतून कवयित्रेने केला आहे दरीतल्या खळखळणा-या गोड पाण्यावर सूर्य भाळतो आहे. तो दरीला म्हणतो की, तू ऐश्वर्याची राणी आहेस. तुझ्या जवळ गोड पाणी आहे. वाईट वाटणा-या सुर्याची व्यथा मांडलेली आहे. 


डोंगर होता उंच 
आणि दरी खोल खोल 
सूर्य वाकून शोधत होता 
दरीमधली ओल 


अडीअडचणीत, संकटात जो धावून येतो तोच खरा राजा असतो असे कवयित्री जंगलातील प्राणी आणि सिंहाचे उदाहरण देऊन सांगते आहे. तर घरात साप निघाल्यावर आपण भीतीपोटी त्याला मारतो. पण सापमित्राकडून कळते की साप हा आपला मित्र आहे. त्या मारु नये त्याला पकडतो आणि जंगलात सोडून देतो. तर यातून काय होते तर मुलांमधील सापाविषयीची भीती निघून जाते. 


गल्ली झाली गोळा
ऐकून आमचा दंगा 
कोणीच नव्हते तयार 
सापाशी घ्यायला पंगा 


एवढ्यात कुणीतरी 
सर्पमित्राला लावला फोन 
पाच मिनिटांत धावून 
आले सर्प मित्र दोन 


सापाचा वाचला जीव 
गेली आमची भीती 
समजून चुकले आम्हाला 
आपण भित्रे किती? 


प्रत्येकाशी नाते जोडत आपण एकत्रित सगळे गुण्यागोविंदाने नांदत राहिले पाहिजे असे कवयित्री ला वाटत असावे. निसर्गाच्या सान्निध्यात राहून अनेक गोष्टी शिकता येतात पण त्याच्याशी कट्टी न करता गट्टी केली पाहिजे असे मुलांना सांगते आहे. एकतेचा संदेश देणा-या ह्या कविता मुलांच्या मनात संस्काराचे बीजारोपण नक्कीच करु पाहणा-या आहेत. तुकारामांनी आपल्या अभंगातून वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरे .....तर ज्ञानेश्वरांनी  हे विश्व ची माझे घर. असे म्हटले आहे. तसेच मुलांनी ही आपलं समजून दया, प्रेम केलं पाहिजे. म्हणूनच तर कवयित्री गट्टी झाली आहे असे म्हणते. आतील कवितेची सुंदर चित्रे श्वेता जगताप व मुखपृष्ठ शिशिर गोटेकर यांनी रेखाटले आहे. नीलमताईच्या पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा! 


              प्रा. रामदास केदार 
              ९८५०३६७१८५


गट्टी झाली आहे 
(बालकविता) 
कवयित्री -नीलम मानगावे 
अक्षरदीप प्रकाशन, रंकाळा 
पृष्ठे :६४ मुल्ये ६०रु.