लवकरच पानगाव येथे कापूस खरेदी केंद्र सुरु करणार -भरत चामले
उदगीर -सध्या संपूर्ण मराठवाड्यात लाॅक डाउन आणि संचारबंदी मुळे शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनाला विक्रीची संधी मिळाली नाही. लातूर भागातून लाॅक डाऊन पूर्वी परळी विभागातील धर्मापुरी नांदगाव केंद्रावर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस विक्री केली आहे. परंतु कोरोणाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव टाळण्यासाठी लाॅक डाऊन मुळे जिल्हा बंदी व इतर कारणाने शेतकऱ्यांना कापूस विक्री करता आली नाही. त्यांच्या कापसाची नोंद बीड जिल्ह्यातही घेतली गेली नाही. लातूर जिल्ह्यातील साडेचार हजार शेतकऱ्यांनी कापूस विक्रीकरिता नोंदणी केली आहेत. मे.व्यंकटेश जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी पानगाव ता.रेणापुर जि.लातूर येथे सर्व सुविधा उपलब्ध असुन,ही फॅक्टरी अद्यावत असल्याने येथे कापुस खरेदी केंद्रसुरू करावे अशी शिफारस महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांचे संचालक भरत तुकाराम चामले यांनी केली आहे. मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी शासनाने कापूस खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्र सुरु करावे. अशी मागणी केली आहे. हमीभाव दरात शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने पानगाव येथील मे. व्यंकटेश जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी पानगाव तालुका रेणापुर जिल्हा-लातूर हे युनिट परिपूर्ण असून या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरु करावे. यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मुंबई यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना मराठवाडा विभागाचे संचालक भरत चामले यांनी एका पत्राद्वारे मागणी केली आहे. आपल्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून खराब होत होता, त्या कापसाला बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. अशीही माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.