निखळ मैत्री आणि संघर्षातून उंच शिखर गाठणाऱ्या मुलांची व्यथा : गोंदू

 



 


 


निखळ मैत्री आणि संघर्षातून उंच शिखर गाठणाऱ्या मुलांची व्यथा :


गोंदू


निखळ मैत्रीचा धागा गुंफत संघर्षातून यशाचे उंच शिखर गाठणाऱ्या  मुलांची व्यथा गोंदू या बालकादंबरीतून प्रकाश जाधव यांनी ग्रामीण शब्दांत मांडलेली आहे. 
             प्रकाश जाधव हे नांदेड जिल्ह्यातील पिंपळगाव येथे शिक्षक या पदावर कार्यरत असून हे अधिनायका कवितासंग्रह. कडतास कथासंग्रह. चिमणगाणी बालगीतसंग्रह तर गोंदू ही बालकादंबरी इत्यादी पुस्तके प्रकाशित झाले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या एम. ए. अभ्यासक्रमात त्यांच्या गोंदू या बालकादंबरी चा समावेश करण्यात आला आहे. ही कादंबरी इंग्रजी भाषेत अनुवाद केली असून त्यांच्या साहित्य लेखनास लोकसंवाद पुरस्कारासह इतरही मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. 
       गोंदू ही बालकादंबरी लिहून मुलांसमोर निखळ मैत्री कशी असावी आणि ही मैत्री जपत जीवनात अनेक अडचणींना सामोरे जात यशांचे उंच शिखर कसे गाठावे हे या कादंबरीतील गोंदू या धडपडणाऱ्या मुलांकडून शिकता येते याची जाणीव ही कादंबरी करुन देते. ही कादंबरी वाचल्यानंतर आपल्याच भोवताली घडलेली वास्तविक आणि जीवंत अशी चित्रनात्मक कथा वाटते. अतिशय सुंदर आणि सुरेख शब्दांची गुंफण ,उत्तम आशय  यामुळे ही कादंबरी प्रत्येक मुलांच्या मनात घर करुन बसणारी आहे असे मला वाटते. कादंबरी लेखनाची सुरुवात ही मनाला आनंद देणारी आहे.निसर्गाचे सुंदर चित्रणाने सुरुवात केली गेली आहे. पहिल्या दोन ओळी अशा क की ,सुर्य मावळतीकडे झेप घेत होता. त्याची तांबुसपिवळी सोनेरी किरणे सा-या शिवारावर पसरली होती. गावातील चुना लावलेल्या भिंती आधिकच उमटून दिसत होत्या. अन् पारावर पोराटोरांची घोळकी खेळत होती. अशा वर्णनातून कादंबरी सुरुवात झाल्याने वाचकाला मोहात टाकते. 
      नावाने गोविंद असणा-या मुलाला सगळेजण गोंदू म्हणत असतात. गोंदूच्या वडिलांनी आयुष्यात काही कमावलं ही नाही आणि गमावलं ही नाही. अशी बिकट परिस्थिती. ही कादंबरी वाचल्यानंतर असे बिकट परिस्थितीत जगणारे अनेक गोंदू डोळ्यासमोर उभे राहतात. महाराष्ट्रात अनेक वंचित घटकांची मुलं अशा परिस्थितीचे बळी ठरतात. पण कादंबरीकाराने या व्यवस्थेला कलाटणी देऊन गोंदूला जगण्याठी हिम्मतीने उभे केले आहे.तसेच टिपू या छोट्या कुत्र्यासोबत निखळ मनातून केलेली मैत्री हाच खरा आदर्श मुलांना घेण्यासारखा आहे. मंदिराच्या दिशेने जात असताना गोंदूला काही घोळका करुन कुत्र्याच्या पिलाला मारत असलेली दिसतात. गोंदू धावतो आणि घायाळ व जखमी पिल्याला घेऊन घराकडे जातो. आई आपली काय म्हणेल याची गोंदूला खूप भिती वाटते आणि तशी आई थोडी कुरबूर करते. आपल्या पोटाला काही नाही अन् याला काय खाऊ घालायचं? अशा प्रश्नाला उत्तर देत गोंदू म्हणतो. माझ्या हिश्शातली मी देईन. यावरुन कुत्र्याच्या पिलावर किती लळा होता. गोदू शाळेला निघाला की हा सारखा टपून असायचा. टाकलेली भाकर वरच्या वर झेलायचा म्हणून गोदूने या पिल्याचे नाव टिपू ठेवले. गोदू आणि टिपू ही दोनच पात्र या कादंबराचा आत्मा आहे. अठरा नखी, खेटर राखी. विस नखी घर राखी, एकविस नखी घर राखी असे म्हणतात म्हणून गोंदू टिपूचे नखे न्याहाळतो. आणि इथे गोदू आणि टिपूची मैत्री घट्ट होते. 
        एका दिवशी गोदू आणि टिपू नदीच्या कडेने जातात. टिपूला आनंद होतो. तर गोंदू हा नकटी कीडा पहात असतो आणि या किड्यावरुनच हेलीकॉप्टर चा शोध लागला असावा असे गोदूला वाटते. नदीच्या पात्रातून वाहत जाणारी चिंधी टिपू अडवून काठावर गोळा करत करत पोहणी शिकतो. पाण्यात अडकून पडलेल्या वस्तू काढण्यांचे जणू प्रशिक्षण टिपू घेतो की काय असे गोंदूला वाटते. मीत्र म्हणून टिपू ला सर्व गोष्टी हा गोदू शिकवित असतो. तर कधी कधी शेजारचा बंड्या टिपूला बदाडतो तेंव्हा गोदू बंड्याच्या अंगावर चढून जातो. एकमेकांच्या सहवासात अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे शिकता येतात हे गोदू आणि टिपू च्या कार्यावरुन दिसुन येते. हा ही संदेश मुलांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. 
      गावात सावकाराच्या घरी मोठी चोरी होते .गाव सगळा गोळा होतो. गोदूने एकांतात टिपूला शिकवलेल्या गोष्टी येथे महत्वाच्या ठरतात. गावातील टवाळ पोरं टिपूला मारलेली असतात. तरी पण गावक-याचे ऐकून गोदू टिपूला घेऊन सावकाराच्या वाड्याकडे जातो. टिपू वासाच्या साह्याने गाव शेजारी असलेल्या विहिरीतून चोरांनी टाकलेला माल हा काढून देतो. तेंव्हा गोदू आणि टिपूचे तोंड भरून केलेले कौतूकाने गोदूची छाती अभिमानाने भरून येते. गोदूची आई आजारी पडते. गोदू आणि टिपू रानातली वन औषधे आणण्यासाठी खूप प्रयत्न करतात पण घरी येईपर्यंत गोदूची आई मरण पावते. टिपूच्याही डोळ्यात मालकीन गेल्यांचे अश्रू भरुन येतात. गोदू च्या जीवनात मागे आड पुढे विहीर अशी अवस्था होते. आता खायाच काय शिकायचं कसं? हा प्रश्न रेंगाळत असताना काकाच्या गावी जाण्याची वेळ गोंदूवर येते. पण टिपूचे काय? तेंव्हा  विनंती करुन टिपूलाही सोबत घेऊन तो निघतो. काका वागाय चांगले तर काकू मात्र गोंदूकडून खूप काम करुन घ्यायची. घरातील सगळी कामं गोंदूला करायची वेळ आली. तापलेल्या इस्त्रीचे चटके अन् फोकांच्या मार खाऊन खूप कंटाळा होता. काकांनी एक दोनदा सांगूनही काकूच्या वागण्यात काही बदल झाला नव्हता. कारण आपले ते आपलेच असतात आणि परके ते परकेच असतात या म्हणीची जाणीव लेखक मुलांना करून देतो आहे. 
    असाच मार काकू शेतात मारत असते. गोंदू तडफडतो. रडतो, तरीही काकूला कीव येत नाही. टिपूला हे दुःख राहवत नाही. टिपू तळमळतो आणि काकूला चावा घेतो काकू घराकडं धूम ठोकते. बंड्यांने गावात टिपूला मारतांना गोंदूने वाचवले. टिपू येथे गोंदूला काकूच्या मारातून वाचवतो. उपकाराची परतफेड कशी करावी याचे सुंदर उदाहरण लेखक मुलांसमोर ठेवतो आहे. 
       काकूच्या जाचाला कंटाळून गोंदू टिपूला घेऊन शहराची वाट धरतो. येथे त्यांच्या ख-या संघर्षाला सुरुवात होते. शहर सगळा रोड ओलांडत कामासाठी फिरतो. शहर आणि शहरची हवा कधी गोंदू आणि टिपूने पाहिलेली नव्हती. खूप हताश होतो. पोटात भूक घेऊन रस्ता ओलांडताना टिपूला गाडीची धडक बसते. टिपूचा पाय फँक्चर होतो. त्याच्या जवळ जाऊन गोंदू धायमोकलून रडत असतांना प्रंचड गर्दी माणसांची आणि वाहनांची होते. धडक दिलेल्या गाडीमालकांने गोंदूला धीर देत टिपूला दवाखान्यात घेऊन जातो तेव्हा सगळी हकीकत गोंदू गाडी मालकास सांगतो तो गुप्तचर खात्याचा अधिकारी असतो. गोंदूला आणि टिपू ला आपल्या घरी घेऊन जातो. जगात अशा अधिका-यासारखी कनवाळू, प्रेमळ ,जीव लावणारी माणसं असतात याची जाणीवही लेखक करुन देतो आहे. 
         गोंदूला शिकवण्याची जबाबदारी हा अधिकारी घेतो. आणि इथेच प्रयत्नाची पराकाष्ठा लावत मिळालेल्या संधीचे सोने करुन घेण्याचा निश्चय गोंदू करतो. गोंदू खूप अभ्यास करायला लागतो. त्याच्या डोळ्यासमोर शहरात शिकताना आपली गरिबी आणि गाव उभा असतो. तर काकूंने मारलेले फटके काही केल्या जात नाहीत. अभ्यास करताना टिपूने दिलेली साथ तो विसरत नाही. अभ्यास करेपर्यंत टिपू ही जवळ जागरण करत असायचा. निकाल लागतो आणि गोंदू हा पहिला क्रमांक पटकावतो. हा आनंद त्या अधिका-याला आणि त्याच्या पत्नीला होतो.अधिका-याच्या मार्गदर्शनाखाली गुप्तचर खात्यातील मोठो नौकरी गोंदू ला लागते. गुप्तचर खात्यात नौकरी असल्याने टिपूची ही खूप मोठी मदत होते. तस्करी करणार्‍या चोरांची गोंदू आणि टिपू त्यांची वाट लावतो. दोंघांनाही मोठा सन्मान मिळतो. सगळीकडे बातम्या झळकतात. गोंदू आपल्या अधिका-यांची संमती घेऊन दिवाळीच्या सणाला स्वता:च्या गाडीत टिपूला घेऊन निघतो. येता येता वाटेत काका काकूची झडती घेतो. दोघे घाबरतात तेंव्हा गोंदू आपली ओळख सांगतो. काकूला आनंद होतो. खूप मारल्यांची माफी मागते तेंव्हा गोंदू म्हणतो. मला मारलं नसतं तर मी पळून जाऊन जिद्दीने अधिकारी झालो नसतो. दुःख आणि चटके सहन केल्याशिवाय सहजा सहजी सुख मिळत नाही याची प्रचिती लेखक करुन देतो आहे. गोंदूंच्या या जिद्द, प्रयत्न,संघर्षातून मिळवलेले यश आणि टिपू या कुत्र्याच्या पिल्यासोबतची शेवटपर्यंत ची निखळ मनाने केलेली मैत्री सर्वांना आदर्श देणारी आहे. म्हणून गोंदूच्या कार्याचा गौरव, सत्कार गावकरी करतात .
      ही बालकादंबरी एकदा वाचाय घेतली की पुर्ण झाल्याशिवाय थांबत नाही. गोंदूंचे टिपूवर असलेल प्रेम एखाद्या निर्झरासारखं निर्मळ, निखळ वाहणारं वाटतं तर परिस्थितीला तोंड देत मोठ्या पदावर विराजमान होणं, मोठ्या पदावर असला तरी आपला मित्र टिपू आणि गाव माती कधी विसरु शकत नाही. हा उत्तम आदर्श प्रत्येक मुलांनी घ्यावा असाच आहे. 
डॉ. पृथ्वीराज तौर सरांनी छान शब्दात या बालकादंबरीची पाठराखण केली आहे. आतील चित्र व मुखपृष्ठ संतोष धोंगडे यांनी सुंदर असे रेखाटले आहे. तर कादंबरीची उत्तम निर्मिती प्रकाशक पांडुरंग पुठ्ठेवाड यांनी केली आहे. साधी, सोपी ग्रामीण बोली भाषेतील ही कादंबरी असल्याने मुलांना नक्कीच आवडणारी आहे. प्रकाश जाधव यांच्या पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा! 


           प्रा. रामदास केदार 
           ९८५०३६७१८५


गोंदू (बालकादंबरी) 
प्र. श्री. जाधव 
८६६८८७१२६४
गणगोत प्रकाशन, मुखेड 
पृष्ठे ५६ .मुल्ये ६० रु.