काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेला गर्दी, अनेकांचा जीव धोक्यात

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेला गर्दी, अनेकांचा जीव धोक्यात





श्रीनगर - काश्मीरमध्ये एका दहशवाद्याच्या अंत्यसंस्कार विधीला १०० पेक्षा जास्त लोकं जमले होते. या नागरिकांनी गर्दी करत लॉकडाऊनचं उल्लंघन केलं असून स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घातला आहे.



जम्मू आणि काश्मीरमधील सोपोर येथे ठार करण्यात आलेल्या जैश चा कमांडर सज्जाद अहमद डार याच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमाला १०० पेक्षा अधिक लोकांनी हजेरी लावली होती. हा दहशतवादी स्थानिक होता, त्यामुळे लोकांनी लॉकडाऊनचं उल्लंघन करत डारच्या जनाना विधीला गर्दी केली होती. काही दिवसांपूर्वी जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे काका आणि फारुक अब्दुल्ला यांचे बंधु मोहम्मद अली मट्टू यांचे निधन झाले. त्यावेळी, ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन आणि प्रसिद्धी माध्यमांतून त्यांच्या समर्थकांना घरीच राहण्याचे आवाहन केलंय. सध्या देशात कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आलं असून नागरिकांनी आपल्या घराकडे न येता, स्वत:च्या घरी राहूनच त्यांच्या काकांप्रती श्रद्धांजली अर्पित करावी, असे आवाहन ओमर अब्दुल्ला यांनी केले होते. मात्र, एका दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेसाठी लोकांनी लॉकडाऊनचं उल्लंघन करत, अनेकांचा जीव धोक्यात घातला.


स्थानिक प्रशासनाने या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सोपोरचे एसएसपी जावेद इक्बाल यांनी, अंत्ययात्रेस सहभागी झालेल्या लोकांवर कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल केल्याचे सांगितले. तसेच, जम्मू-काश्मीर पोलीसच्या काश्मीर विभागातील आयजीपी विजय कुमार म्हणाले की, सज्जाद यास संघटनेसाठी स्थानिक युवकांनी भरती करण्याचं काम सोपविण्यात आलं होतं. त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल आहेत. येथील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे तीन ते चार दहशतवादी लपून बसले होते. त्यांच्यावर भारतीय सैन्याच्या २२ राष्ट्रीय रायफल, १७९ बटालियन सीआरपीएफ आणि एसओजी जवानांनी कारवाईसाठी मिशन हाती घेतले होते. त्यामध्ये कमांडर सज्जादला मारण्यास जवानांना यश आलंय.


दरम्यान, राज्यात बुधवारी ११७ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १,२०५ झाली आहे. राज्यात आठ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यूंची नोंद झाली आहे. त्या मृत्यूंपैकी ५ मुंबईत, २ पुणे येथे तर १ कल्याण डोंबिवलीमधील आहे. पाचपैकी दोन मृत्यू बुधवारी झाले असून त्यातील एक मुंबई व एक पुण्याचा आहे. त्यामुळे कोविड-१९ मुळे राज्यात आजवर झालेल्या मृत्यूंची संख्या आता ७५ झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २७,०९० नमुन्यांपैकी २५,७५३ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरता निगेटिव्ह आले आहेत तर १,१३५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ११७ करोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३४,९०४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४४४४ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.