रस्ते विकास योजनेतून गायब झालेला हत्तीबेटाचा रस्ता पुन्हा
नकाशावर
सा.बां. राज्यमंत्री बनसोडे यांचा होता पुढाकार
उदगीर--रस्ते विकास योजनेच्या नकाशावरून गायब झालेला हत्तीबेट पर्यटन स्थळाचा रस्ता मंगळवारी मंत्रालयातून पुन्हा नकाशावर आला.
दोन राज्य मार्ग, दोन प्रमुख जिल्हा मार्ग ,चार ग्रामीण मार्गासह हत्तीबेट पर्यटन स्थळास जोडला गेलेला हणमंतवाडी पाटी-हत्तीबेट-ममदापूर हा 4.20कि. मी. चा रस्ता 1981 ते2001 या रस्ते विकास योजनेत होता. रस्ते विकास योजनेत हा रस्ता असल्याने या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण तीन वेळा झाले होते.नंतर मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या 2001 ते 2021 च्या रस्ते विकास योजनेत हा रस्ता समाविष्ट केला नव्हता. त्यामुळे या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती जिल्हा परिषद बांधकाम व सार्वजनिक बांधकाम विभाग करीत नव्हते.2001 ते2021 च्या रस्ते विकास योजनेत हा रस्ता चुकून समाविष्ट करण्याचे राहिले असल्याचे संबंधित विभागाला निदर्शनास आणून देवूनही या रस्त्याला नंबर नसल्याने या विभागाकडून या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती होत नव्हती. या रस्त्यावरून दररोज एस. टी. महामंडळाच्या 20 बसेस व हत्तीबेट पर्यटन स्थळास भेट देणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची वर्दळ असताना रस्त्यावर मोठमोठी गुडघ्याएवढी पडलेली खड्डे वर्षानुवर्षे दुरुस्ती न होता तशीच आहेत. रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने रस्त्याची दुर्दशा पाहण्यासारखी झालेली आहे.
हा रस्ते विकास योजनेतून गायब झालेल्या रस्त्यास नंबर मिळून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी तत्कालीन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे केली असता त्यांनी या रस्त्यास नंबर मिळेपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र या रस्त्यास नंबर मिळून हा रस्ता2001 ते2021 च्या रस्ते विकास योजनेत नकाशावर घेण्यात यावा. अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे हत्तीबेट भक्तांनी मागणी केली होती. राज्यमंत्री बनसोडे यांनी हत्तीबेटाचा रस्ता तात्काळ नकाशावर घेवून रस्ता दुरुस्त केला जाईल अशी ग्वाही हत्तीबेट भक्तांना दिली होती. मंगळवारी या रस्त्याचे आदेश मंत्रालयातून जारी करण्यात आले.नियोजन विभागाचे अवर सचिव प्रशांत पाटील यांनी हणमंतवाडी पाटी-हत्तीबेट-ममदापूर या 4.20कि. मी. रस्त्यासाठी ग्रामीण मार्ग 68 हा क्रमांक देण्यात आला आहे.लातूर जिल्ह्यातील ग्रामीण मार्ग म्हणून हा रस्ता दरजोन्नत करण्यात आला असल्याचे हे आदेश मंगळवारी जारी करण्यात आले आहेत. हा गायब झालेला रस्ता पुन्हा नकाशावर आल्यामुळे हत्तीबेट पंचक्रोशीतील नागरिकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
ReplyForward |