टंचाईकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची गय केली जाणार नाही
-तहसीलदार श्री मुंडे यांचा इशारा
उदगीर, ता. सध्या उन्हाळ्याला सुरुवात होत असून तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू शकते. या टंचाईकडे लक्ष ठेवून तात्काळ उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्या. टंचाईकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा तहसीलदार वेंकटेश मुंडे यांनी दिला आहे.
येथील राजीव गांधी सभागृहात मंगळवारी (ता.3) घेण्यात आलेल्या ग्रामसेवक, सरपंच, तलाठी यांच्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण उपस्थित होते. या बैठकीस बहुतांशी तलाठी सरपंच ग्रामसेवक उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार श्री मुंडे म्हणाले हळूहळू तापमानात वाढ होत आहे. अनेक गावासह वाडी ताड्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. मार्च, एप्रिल, मे व जून या चार महिन्यांच्या काळामध्ये उदगीर तालुक्यातील सर्व गावांमध्ये टंचाईच्या काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली पाहिजे. यासाठीचे नियोजन आत्तापासूनच होणे आवश्यक आहे.
जेथे विहीर, बोअरचे अधिगृहण करायचे असतील तेथे पर्यायी व्यवस्था असणे महत्वाचे आहे. शिवाय टॅंकरची शक्यता व टँकर भरण्यासाठी लागणारे पाणी याचेही नियोजन वेळेवर झाले पाहिजे. या टंचाईच्या काळामध्ये शासनाच्या प्रतिनिधी कडून निष्काळजीपणा होता कामा नये. या टंचाईच्या काळात कोणाचीही गय केली जाणार नाही असे श्री मुंडे यांनी सांगितले.
--
चौकटीत- अनावश्यक अधिग्रहणावर कार्यवाही....
या टंचाईच्या काळात जिथे जिथे आवश्यक आहे तिथे अधिग्रहण किंवा टॅंकरने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. मात्र जिथे गरज नाही तेथे अनावश्यक अधिग्रहण किंवा टँकर लागल्यास अधिग्रहणाचा प्रस्ताव सादर करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा गटविकास अधिकारी श्री चव्हाण यांनी दिला आहे.