विज्ञानामुळे मानवी जीवन सुखी झाले प्रा. नारखेडे
उदगीर -=विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी जीवनाला भौतिक सुविधा पुरवण्याचे साधने प्राप्त झाली. एकार्थाने विज्ञानाची प्रगती म्हणजे मानवी जीवनाची प्रगती होय. असे विचार प्रा. आर. के. नारखेडे यांनी व्यक्त केले. ते उदगीर येथील शामलाल स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शामलाल स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एल. पी. उगिले हे होते. तर व्यासपीठावर उपमुख्याध्यापिका श्रीमती जयश्री सगर, पर्यवेक्षक शिवाजीराव आपटे, ज्येष्ठ शिक्षक पी. एम. नाईक, संजय देबडवार यांच्यासह संयोजक आर जे लिमये, अविनाश घोळवे, उमाकांत सूर्यवंशी, श्रीमती आसमा उंटवाले, श्रीमती के.आर. जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना प्राध्यापक नारखेडे म्हणाले की, विज्ञानाच्या प्रगतीमुळे समाजाला दिशा मिळणार आहे. तसेच प्रबोधनाचे काम होणार आहे. विज्ञान हा कुतूहलाचा विषय आहे. तसा पूर्ण समजायला कठीण विषय वाटतो, मात्र वास्तविक तसे नाही. विज्ञानातून आनंद मिळतो. तसेच आपल्या जिज्ञासेने समाधान झाल्यानंतर एक नवनिर्मितीचा ,समाधानाचा भाग मानवी जीवनाला प्राप्त होतो.
भारताने विज्ञानात उत्तम कामगिरी केली आहे. हा वारसा नव्या पिढीने जपला पाहिजे. भारतीय संस्कृती विज्ञानाच्या सर्जनशील आणि लोकांच्या भल्यासाठी उपयोग करण्याचे मार्गदर्शन करते. हा विषय आपल्यासाठी गौरवशाली वारसा बनला पाहिजे. भारतीय शास्त्रज्ञांमध्ये जगदीश चंद्र बोस यांनी विज्ञानाचे आव्हान स्वीकारले, भौतिकशास्त्र विषयात त्यांनी मोठे योगदान दिले. बिनतारी संदेश देण्यासाठी त्यांनी नवे तंत्र विकसित केले आणि हेच तंत्र म्हणजेच आजच्या युगातील मोबाईल फोन होय असे प्राध्यापक नारखेडे यांनी सांगितले. दुर्दैव म्हणजे या संशोधनाचे श्रेय इतरांनी लाटल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली .वैज्ञानिक क्षेत्रात विज्ञानामुळे मोठी प्रगती झाली आहे. मूलभूत विज्ञानाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे याकडे तरुण पिढीने वळण्याची गरज आहे. असे सांगितले डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉक्टर सी. व्ही. रमण ,कणाद ऋषि, रामानुजन, आर्यभट्ट यांनी वैज्ञानिक प्रगती करून भारताचे नाव जगाच्या पाठीवर पोहोचवले असे सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अविनाश घोळवे यांनी केले तर आभार प्रदर्शन आर. जे. लिमये यांनी केले.
Attachments area