उदगीर येथे कोरोनावर तातडीची बैठक, फक्त शासकीय रुग्णालयांत उपचार


उदगीर येथे कोरोनावर तातडीची बैठक, फक्त शासकीय रुग्णालयांत उपचार







तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या उदगीरमध्ये कोरोना विषाणूचा संशयित रुग्ण आढळला तर नेमके काय केले पाहिजे, डॉक्टरांनी आणि रुग्णावर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत मार्गदर्शक सूचना देण्याकरिता तातडीने बैठक घेण्यात आली.


Coronavirus Udgir News






उदगीर  (जि.लातूर)-जिल्हा अधीक्षकांच्या सूचनेनुसार उदगीर येथे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे यांनी कोरोनाबाबत संपूर्ण माहिती देण्याकरिता डॉक्टरांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. केवळ सर्दी, ताप व खोकला आहे म्हणून घाबरून जाऊ नये. मात्र जर तो रुग्ण कोरोना विषाणूबाधित रुग्णाच्या संपर्कात आला असेल किंवा विदेशातून आला असेल तर त्या रुग्णाला तातडीने शासकीय रुग्णालयात उभारण्यात आलेल्या विशेष कक्षात दाखल करावे. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती घेऊन त्या कुटुंबावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यापैकी कोणालाही सर्दी, ताप अशी लक्षणे दिसली तर तातडीने रुग्णालयात संशयित रुग्ण म्हणून दाखल करण्याबाबत या बैठकीत सूचना देण्यात आली. अशा प्रकारच्या संशयित रुग्णाचा तपासणी अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आल्यानंतरच रुग्णाला घरी पाठविण्यात येणार आहे.


 

एखादी व्यक्ती संशयित रुग्ण म्हणून दाखल झाल्याचे समजले तरीही घाबरून जाऊ नये. त्या रुग्णाचा अहवाल कोरोनाबाधित निघाला तरच त्याच्या संपर्कातील लोकांनी काळजी घेण्याची आणि तपासणी करून घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा इतरांनी घाबरण्याचे कारण नाही, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
आरोग्य विभागाने घेतलेल्या बैठकीमध्ये सर्व वैद्यकीय कर्मचारी, नागरिक, शालेय विद्यार्थ्यांनी वेळोवेळी हात स्वच्छ धुतले तर कोरोना विषाणूचा प्रसार रोखला जाऊ शकतो. यामुळे याबाबत मित्र, नातेवाइकांना माहिती देण्यावर भर देण्याबाबत सांगण्यात आले.


प्रार्थना सावलीत घेत विद्यार्थ्यांची घेतली जात आहे काळजी
कोरोनाच्या भीतीने शाळेतील एखाद्या विद्यार्थ्याला सर्दी, ताप आला तर पालकवर्गात घबराट होऊ नये म्हणून अनेक शाळांतून विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. नुकताच उन्हाळा सुरू झाला आहे. यातच आता माध्यमिक आणि प्राथमिक वर्गाच्या लवकरच परीक्षा सुरू होणार आहेत. अशातच कोठल्याही कारणाने विद्यार्थ्याला जर सर्दी-ताप झाला तर लोकांच्या भीतीमुळे अफवा पसरून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. यातून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते म्हणून त्याला कुठल्याच कारणाने त्रास होऊ नये यासाठी शाळेच्या प्रांगणात दररोज होणारी प्रार्थना आता सावलीत घेतली जात आहे. सर्व शाळेतून विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुण्याबाबत सांगण्यात येत आहे. सर्दी-ताप असलेल्या विद्यार्थ्यांना सुटी दिली जात आहे.


कोरोनाच्या भीतीने विनाकारण सर्वजण मास्क वापरीत असून, त्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. केवळ वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित कर्मचारी आणि सर्दी-खोकला असलेल्या रुग्णांनीच मास्क वापरण्याची गरज आहे. नागरिकांनी फक्त गर्दीच्या ठिकाणी असताना किंवा सर्दी, खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या रुग्णाला भेटायला जाताना नाकाला आणि तोंडाला रुमाल लावावा. सर्दी-ताप-खोकला कमी होत नसेल आणि संशय असेल तर खासगी रुग्णालयात दाखल न होता तातडीने शासकीय रुग्णालयात विशेष कक्षात दाखल व्हावे. कोठल्याही खासगी रुग्णालयात कोरोनाबाबत तपासणीची सुविधा उपलब्ध नाही. संशय आला म्हणून घाबरून जाऊ नये. शासकीय रुग्णालयात दाखल होऊन योग्य उपचार घ्यावेत.
- डॉ. शशिकांत देशपांडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, उदगीर.