अंत्यसंस्कार करण्यासाठी गाईच्या शेणापासून जळतन गोशाळेचे एक पाऊल पुढे
अंत्यसंस्कार करण्यासाठी गाईच्या शेणापासून जळतन

गोशाळेचे एक पाऊल पुढे

तयार झालेले सर्व जळतन पालिका खरेदी


उदगीर--मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सोमनाथपुर (ता. उदगीर)येथील गोरक्षण संस्थेने गाईच्या शेणापासून जळतन तयार करण्यास सुरुवात केली आहे. या संस्थेने तयार केलेले सर्व जळतन  उदगीर नगर परिषद खरेदी करणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी दिली.

सोमनाथपुर येथील गोरक्षण संस्थेने गोमूत्र, फिनेल, गांडूळखत, जीवामृत तयार करण्याबरोबरच आता गाईच्या शेणापासून जळतन तयार करण्यास सुरुवात केली आहे.

या कामाचा शुभारंभ पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिल भिकाने, प्रा. एस. एस. पाटील, विजयराज भुतडा, माधव नौबदे, काशिनाथ स्वामी  यांची उपस्थिती होती.

सोमनाथपुर येथील गोरक्षण संस्थेत 200 च्या वर लहान मोठे गायी-वासरे आहेत. या पशूंना चाऱ्यासाठी 60एकर जमीन असल्याने या जमिनीवर या पशूंना हिरव्या चाऱ्याची सोय केली आहे. संस्थेने पिंपरी तलावाखाली एक मोठी विहीर, दोन कूपनलिका, एक शेततळे तयार करून पशूंच्या पाणी-चाऱ्याची सोय केली आहे.आता हे तयार करण्यात येणारे जळतानाचा उपयोग भट्टी व बंब पेटविणे, बॉयलर, चुली व मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी होणार आहे. पर्यावरणाला पोषक व वृक्ष तोडीला आळा यामुळे बसणार आहे. या संस्थेने तयार केलेले सर्व जळतन पालिकेकडून खरेदी केली जाईल अशी घोषणा मुख्याधिकारी भारत राठोड यांनी यावेळी बोलताना केली.