तरीही वाहनचालक बेफिकीर
हेल्मेटमध्ये मोबाइल ठेवून बोलणेही धोकादायकच
हल्ली वाहनचालक हेल्मेटमध्ये मोबाइल ठेऊन बोलतच वाहने चालवत असल्याचे दिसून येते. चालत्या वाहनावर मोबाइलवरुन संवाद साधण्यात अडथळा येतो, आवाज व्यवस्थित येत नाही. यामुळे वाहनचालकांचे लक्ष रस्त्यावरील इतर वाहनांऐवजी मोबाइलवरील संवादावरच अधिक असते. वाहनचालकांकडून महामार्गालगत किंवा रस्त्यालगत लावलेल्या सूचनाफलकांकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावते. त्याचप्रमाणे मोबाइलवर बोलत असताना अचानक गतिरोधक, दुभाजक, खड्डे, यामुळे वाहन सावरण्याच्या नादात शेकडो वाहनचालक गंभीर जखमी झाले आहेत.
मोबाइलमुळे अपघाताची शक्यता चौपटीने वाढते
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, भारतात दर तासाला 16 लोक रस्ता अपघातात आपला जीव गमावतात. त्यापैकी अनेक अपघातात मोबाइल फोन कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. मोबाइलवर बोलताना गाडी चालवल्यास अपघाताची शक्यता चारपटीने वाढते. यासंदर्भात सेव्ह लाईफ फाउंडेशन संस्थेने सर्व्हेक्षण केले. या सर्व्हेक्षणातही अशीच तथ्ये समोर आली आहेत.
केवळ तरुणच नव्हे तर प्रौढ व्यक्ती व महिलावर्गही सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळत आहे. कारवाईबरोबरच वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे. पालकांनीही सजग रहावे, मुलांकडून अपघात घडल्यास शिक्षा पालकांना भोगावी लागते.गेल्या पंधरा दिवसात पायी चालणाऱ्यांना धडक दिल्याच्या दोन घटना घडल्या आहेत.
- प्रदीप लोंढे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी