सजीवाला अन्नातून मिळणारी ऊर्जा
रोज नवा दिवस उजाडला की, प्रथम प्रत्येक सजीवाला जाणीव होते, ती उदरभरणाची. आपण नेहमी म्हणतोच ना 'उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म'; पण या उदरभरणातून पोषण क्रिया कशी होते व सजीवांना हालचालीसाठी प्रत्यक्ष ऊर्जा कशी प्राप्त होते, याबद्दल मात्र अनेकजण अनभिज्ञ असतात.
अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले, तर कोणत्याही पदार्थाचे प्रथम साखरेत रूपांतर केले जाते. साखरेमध्ये कार्बनचे अणू असतात. हवेतील प्राणवायू श्वसनाद्वारे शरीरात घेतला जातो. त्यांचा संयोग होऊन ऊर्जा बाहेर पडते. शरीर ती वापरते व कार्बनडाय ऑक्साईड बाहेर टाकला जातो. या सर्व क्रियेमध्ये विविध स्वरूपांची टाकाऊ द्रव्ये तयार होतात. ती द्रव्येसुद्धा मल, मुत्र, घाम या स्वरूपात बाहेर टाकली जातात.
प्रत्येक सजीवाचे ऊर्जा मिळवण्याचे तंत्र मात्र वेगवेगळे असते. या विविध तंत्रांनुसार त्यांच्या शरीराची, अन्ननलिकेची, अन्नपचनसंस्थेची रचना असते. हेतू व साध्य एकच; पण ही विविधता मात्र अगदी थक्क करणारी असते.
माणूस सोडला तर अन्न शिजवणे कोणाच सजीवाला माहित नाही. अनेक एकपेशीय प्राणी चक्क खाद्यपदार्थ अख्ख्या आकारातच वेढून गिळून फस्त करतात. पण त्यावर रासायनिक क्रिया होऊन पचन केले जाते.
शाकाहारी प्राणी वनस्पतीमध्ये असणाऱ्या सेल्युलोज या द्रव्यापासून आपला आहार मिळवतात. रवंथ करणारे प्राणी वनस्पतींच्या पेशी आवरणात असणारे सेल्युलोज पचवू शकतात. मनुष्य ते पचवू शकत नाही.
सरपटणारे प्राणी साप, नाग, अजगर यांची अन्न मिळवण्याची पद्धत आणखीच वेगळी. ज्याला आपण विष समजतो, ते त्यांचे अन्नपाचक, एन्झाइम वा वितंचक असते. या विषामुळेच खाद्यपदार्थांचे म्हणजे छोटे साप, उंदीर इत्यादी प्राण्यांना अख्खे गिळंकृत करूनही त्यांचे पचन चांगले होते व त्यापासून भरपूर ऊर्जा त्यांना मिळते. अजगराची पाचकशक्ती व पाचकरस इतके तीव्र असतात की, अख्खे हरिण त्याने गिळले, तर फक्त केसांचे काही पुंजके सोडले, तर हाडेसुद्धा पचविली जातात. एखादे हरीण गिळून चक्क महिनाभर सुस्तावणारा अजगर त्यामुळेच निवांत राहतो.
पेलिकन जातीची बदके अख्खे मासे मटकावतात; पण सगळा मासा गिळणे जरा कठीणच असते. त्यांच्या प्रचंड चोचीच्या खाली असलेल्या मोठ्या पिशवीवजा घाटीमध्ये प्रथम हा मासा विसावतो. मग यथावकाश तो गट्टम करायची क्रिया केली जाते.
प्रत्येकाची अन्नाची गरज हवामान व हालचाल यांवर अवलंबून असते. उष्ण हवामानात राहणाऱ्या प्राण्यांना लागणारी ऊर्जा त्यामानाने कमी असते. शरीर पुरेसे उष्ण राहण्यासाठी त्यांना जास्त ऊर्जा लागत नाही. याउलट थंड प्रदेशातील सुस्त प्राण्यांना केवळ थंडीशी मुकाबला करायलाही खूपच ऊर्जा खर्च करावी लागते. आर्क्टिक प्रदेशातील अस्वले त्यामुळेच मोठय़ा प्रमाणावर मासे खाण्यात पटाईत असतात.
जगातील इतर प्राणी सोडून द्या. पण एस्किमो मंडळींना रोजच्या अन्नातून किती ऊर्जा (कॅलरीज) आवश्यक असेल असे वाटते ? कडक हिवाळ्याच्या दिवशी तगडा एस्किमो किमान सात हजार कॅलरीज मिळतील असे अन्न सहज मटकावतो. याउलट भारतात दोन हजार ते बावीसशे कॅलरीज मिळाल्या, तर त्याच आकाराच्या व वजनाच्या भारतीयाचे पोट भरगच्च भरलेले असते. अन्नातून मिळणारी ऊर्जा ही किती महत्त्वाची आहे, हे आता पक्के लक्षात राहील, नाही का ?
संकलन
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
साभार
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*