अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार : अजित पवारांची ग्वाही

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार : अजित पवारांची ग्वाही





मुंबई : विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज मिळण्याबाबत प्रश्न होता. यावर उत्तर देत राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात दोन दिवसांपूर्वी कर्जमाफी योजना सुरु झाली आहे. तीन महिन्यात ही कर्जमाफी देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही अजित पवारांनी विधानसभेत सांगितलं.


दरम्यान, राज्य सरकारने जी कर्जमाफी योजना लागू केली आहे. त्याचा लाभ सप्टेंबर 2019 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे, त्यांना मिळणार आहे. मात्र अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे ऑक्टोबर 2019 नंतर कर्ज थकीत आहे. अशा शेतकऱ्यांना सरकारने दिलासा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.


तसेच, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी ठाकरे सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली. कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 68 गावांमधील 15 हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची बँक खाती आधार कार्डशी लिंक करुन मगच कर्जमाफीचे पैसे जमा करण्यात येतील.


त्याचप्रमाणे कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी शुक्रवारी (ता. २८ )जाहीर करणार असून शेतकऱ्यांचे कर्जखाते आधार कार्डशी जोडून त्यात कर्जमाफीचे पैसे जमा करणार असल्याची घोषणा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.