भाजपच्या गटबाजी आणि जातीयवादी भूमिकेला वैतागून लिंगायत समाजाच्या जि प सदस्यांचे सामुदायिक राजीनामे
उदगीर ........
लातूर जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असली तरीही, या सत्तेत सहभागी असलेले स्वकर्तृत्वावर मोठ्या मतांनी विजय मिळवलेले, लिंगायत समाजाचे पाच जिल्हा परिषद सदस्यांनी भारतीय जनता पक्षावर नाराजी व्यक्त करत सदस्यत्वाचे सामुदायिक राजीनामे भारतीय जनता पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष रमेश आप्पा कराड यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. गेल्या अडीच वर्षात लिंगायत समाजाच्या जिल्हा परिषद सदस्यांना हेतुत: डावलण्यात आले. त्यांना विकासाच्या निधी पासून दूर ठेवून, अत्यंत तुटपुंजा निधी देऊन त्यांची बोळवण करण्यात आली. एका अर्थाने लिंगायत समाजाची फार मोठी हेळसांड जिल्हा परिषदेच्या राजकारणात गटबाजी आणि जातीयवादी भूमिका घेणाऱ्या नेत्याकडून झाल्यामुळे लिंगायत समाज प्रचंड नाराज होता. मराठवाड्यामध्ये लिंगायत समाजाला विधानसभा, लोकसभा किंवा विधानपरिषद हे तर सोडाच जिल्हा परिषदेमध्ये देखील विकासाचा गाडा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांना डावलून त्यांना अत्यंत तोकडा निधी देऊन, त्यांच्या विकास कामावर गदा आणली. याचा राग लिंगायत समाजाच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे लिंगायत समाजाने दबाव टाकून सर्व जिल्हा परिषद सदस्यांना समाजाच्या स्वाभिमानासाठी राजीनामे देण्याचा आदेश दिल्यामुळे या पाचही जिल्हा परिषद सदस्यांनी सामुदायिक राजीनामा दिला आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांना कोणालाही दुबार संधी दिली जाणार नाही. असेच सांगून त्यांना पदापासून दूर ठेवले, मात्र आपल्या गटातटाचे आणि सग्या सोयर्यांचे नातेसंबंध जोडून काही जणांना पुन्हा संधी दिली. याचाही राग लिंगायत समाजाच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे या पाच सदस्यांनी राजीनामे दिले .त्यामध्ये बसवराज बाबाराव बिरादार कौळखेडकर , महेश वसंतराव पाटील, मिलिंद आप्पा लातूरे, सौ उषाताई शंकरराव रोडगे, सौ विजया बसवराज बिरादर यांचा समावेश आहे.
प्रतिक्रिया ........
समाजाच्या सन्मानासाठी राजीनामे
गेली अडीच वर्ष भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून आम्हाला उपेक्षित पणाची वागणूक मिळाली. आमच्या मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कमी मिळाला. तरीही केवळ आणि केवळ पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये. आपल्या नेत्यांची बदनामी होऊ नये. आणि पुढील अडीच वर्षाच्या काळात आपल्या समाजाला संधी मिळेल, या आशेवर आम्ही आमचा अपमान सहन केला. मात्र अडीच वर्षांनंतर देखील लिंगायत समाजाच्या प्रतिनिधींना हा सन्मान मिळाला नाही.ना कोणते पद मिळाले ना सन्मान या मुळे लिंगायत समाजाच्या नेत्यांच्या आदेशाने समाजाचा सन्मान कायम ठेवण्यासाठी आणि आमचा स्वाभिमान राखण्यासाठी आम्ही राजीनामे देत आहोत.
सौ विजया बसवराज बिरादार
जि. प. सदस्य तोंडार ता.उदगीर