उदगीरच्या एमआयडीसी जागा पाहणीसाठी मुंबईचे पथक दाखल





उदगीरच्या एमआयडीसी जागा पाहणीसाठी मुंबईचे पथक दाखल

प्रत्यक्षात पाहणी चालू झाल्याने उदगीरकरांच्या आशा पल्लवित

 


उदगीर, ता. 21 : गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला, उदगीरच्या अतिशय जिव्हाळ्याचा, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचा प्रकल्प सुरु व्हावा हा प्रश्न सुटणार आहे.या महामंडळाचे मुंबईचे पथक शुक्रवारी (ता.21) स्थळपाहणीसाठी उदगीरात दाखल झाल्याने उदगीर करांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

लातूरनंतर उदगीर जिल्ह्यात दोन नंबरची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते.हे सीमावर्ती भागातील महत्त्वाचे शहर आहे. लातूरच्या आधी निजामजाम काळापासून उदगीरला रेल्वेचे जाळे आहे. या मार्गावरून अनेक मालगाड्या धावतात. या भागात पडीक जमीन मोठ्या प्रमाणावर आहे. एवढी पोषक स्थिती असतानाही गेल्या अनेक एक वर्षापासून येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाचे क्षेत्र निर्माण होऊ शकले नाही. त्यामुळे उद्योगधंद्याचा मोठा अनुशेष येथे शिल्लक आहे.

1995 साली युती शासनाच्या काळात तत्कालीन आमदार प्रा.मनोहर पटवारी यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने 619 हेक्टरची औद्योगिक वसाहतीचे क्षेत्र मंजूर करण्यात आले होते. मात्र लोणी हकनकवाडी व तोंडावर परिसरातील ग्रामस्थांनी जमिनी देण्यास विरोध केल्याने व पाठपुरावा कमी पडल्यामुळे हे औद्योगिक क्षेत्र प्रत्यक्षात अमलात आले नाही.

त्यानंतर अनेक वेळा या भागातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करूनही या औद्योगिक वसाहतीच्या क्षेत्राला मंजुरी मिळू शकली नाही. या परिसरातील एमआयडीसीचा हा महत्त्वाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने विधानसभा, लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व पक्षाच्या अजेंड्यावर असतो. मात्र काहींनी पाठपुरावा केला तर काहींनी पाठपुरावा सुद्धा केला नाही. त्यामुळे उदगीरकराची ही अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही.

2014ला राज्यात पुन्हा भाजपा सेना युतीची सत्ता आली उदगीरचे तत्कालीन आमदार सुधाकर भालेराव हे भाजपाचे असूनही त्यांनी एमआयडीसीसाठी केलेल्या प्रयत्नाला यश मिळू शकले नाही. 2019 मध्ये राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महा महाआघाडीचे सरकार सत्तेत आले. उदगीरचे राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांना राज्यमंत्रीपद मिळाले. त्यानी हा विषय लावून धरल्याने या प्रक्रियेला पुन्हा सुरुवात झाली आहे. 

शुक्रवारी (ता.21) महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या पथकाने उदगीर तालुक्यातील अनेक ठिकाणी भेटी देऊन स्थळ पाहणी केली. उदगीर देगलूर रोड वरील नागलगाव, चांदेगाव पाटी ते मुक्रमाबाद पर्यंत या पथकाने जागेची पाहणी केली. किती जागा मिळू शकते? हे क्षेत्र किती जागेत निर्माण करता येऊ शकते? याची चाचपणी सुरू झाल्याने उदगीर करांच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत.

--

चौकटीत-पाणी व जमीन उपलब्ध करून द्यावी.

उदगीर परिसरात एमआयडीसी करण्यास शासन सकारात्मक आहे.उदगीर हे या सीमाभागातील महत्त्वाचे केंद्र आहे.यासाठी या भागातील लोकप्रतिनिधी, उद्योजक यानी आम्हाला पाणी व जमीन उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर यानी बैठकीत केले आहे.


 

 




 

Attachments area