म्हणून मनसे ठेवणार आता सर्व माध्यमांच्या शाळांवर नजर!

म्हणून मनसे ठेवणार आता सर्व माध्यमांच्या शाळांवर नजर!


 



पुणे : मराठी दिनाचे औचित्य साधत राज्यभरातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय शिकवणे अनिवार्य करणार असल्याची घोषणा राज्य सरकारने विधी मंडळात केली. या पार्श्वभूमीवर सर्व शाळांमध्ये मराठी विषय शिकवला जातो का, याची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाहणी करणार आहे. त्यासाठी मनसे देखरेख पथक स्थापन करणार असल्याची माहिती मनसे नेते अनिल शिदोरे यांनी दिली.


राज्यातील शासकीय, निमशासकीय, खासगी, केंद्रीय, आंतरराष्ट्रीय या सर्व शाळांमध्येदेखील मराठी अनिवार्य करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून, ज्या शाळा या नियमाची अंमलबजावणी करणार नाही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, प्राथमिक आणि माध्यमिक अशा वर्गवारीत टप्प्याटप्प्याने या मराठी भाषा सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.


राज्यभर 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.या पार्श्वभूमीवर बोलताना शिदोरे म्हणाले की, मराठी भाषेबाबत कायदे केले जातात. अनेक घोषणाही केल्या जातात मात्र, त्याची अंमलबाजवणी होत नाही. त्यामुळे मराठी अनिवार्य करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्याचे काम मनसे करणार आहे.


दरम्यान,राज्यात पहिली ते दहावी मराठी विषय सक्तीचा करण्यात आला असून याबाबतचं विधेयक विधानपरिषदेत एकमताने मंजूर करण्यात आलं. येत्या शैक्षणिक वर्ष 2020-2021 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तर उल्लंघन करणाऱ्या शाळाप्रमुखांना 1 लाख रुपये दंडाची तरतूद या विधेयकात आहे.