ओबीसी प्रमाणेच सर्व जातींची जातनिहाय जनगणना करावी

ओबीसी प्रमाणेच सर्व जातींची जातनिहाय जनगणना करावी





मुंबई : ओबीसी़ंची जातनिहाय जनगणना व्हावी, अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली. राज्य सरकारने पुन्हा याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन पाठपुरावा करावा, असे छगन भुजबळ राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात म्हणाले होते.


याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी 'केवळ इतर मागास वर्गीय अर्थात ओबीसी नाही, तर सर्वच जातींची जनगणना झाली पाहिजे, असे अशी मागणी केली होती. दरम्यान, अखिल भारतीय ब्राह्मण युवक महासंघ तसेच आर पी आई ब्राह्मण आघाडीने रामदास आठवले यांच्या या मागणीला पाठींबा दिला आहे.जर ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना होत असेल तर सर्व जातींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे,अशी मागणी या दोन्ही संघटनांनी केली आहे.


तसेच सर्वच जातींची जातनिहाय जनगणना झाल्यामुळे सर्व जातींची लोकसंख्या समजेल. त्यामुळे त्या त्या जातींचा विकास होण्यासाठी सरकारला पाऊले उचलावीच लागतील. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी संकुचित भूमिका न घेता या मागणी प्रमाने सर्व जातींची जनगणना करण्याची घोषणा करावी. अशी मागणी आरपीआय चे राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी यांनी केली आहे.


दरम्यान, ओबीसीची जनगणना केल्यास जातीवादाला खतपाणी मिळेल, अशी भीती बाळगण्याची कोणतीही गरज नाही. जातीची जनगणना झाल्यास त्या संबंधित जातीसाठी आवश्यक त्या उपयाययोजना करणे अधिक सोपे होणार असल्याचे आठवले यावेळी म्हंटले होते. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या विचारधारेच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी भूमिका घेत असल्याने हे पक्ष शिवसेनेला अडचणीत आणत असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केलं. राजधानी दिल्लीत झालेल्या दंगलीला केंद्र सरकार जबाबदार नाही. मात्र, काँग्रेस यात राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.