पैशाला प्राधान्य न देता पेशंट बरा करण्याचं ध्येय
डॉक्टरांकडून चेकअप झाल्यावर त्यांच्या कॅबिन मधुन बाहेर येऊन फी देण्यासाठी रीसेप्शनिस्ट च्या टेबलापाशी येऊन थांबलो, तर मॅडम म्हणाल्या "फी ऐच्छिक आहे... इच्छा असेल तेवढी द्या, नाही दिली तरी चालेल".
माझ्यासाठी हा कौतुक मिश्रित सुखद धक्काच होता... आजकाल स्पेशालिस्ट डॉक्टरांची फी 500 ते 1000 रुपये नक्कीच असते तिथं ह्यांनी ऐच्छिक फी ची पाटी लावली होती.
पैशाला प्राधान्य न देता पेशंट बरा करण्याचं ध्येय आणि मनाचा मोठेपणा असल्या शिवाय हे शक्य नाही.
मॅडमच्या परवानगीने मी हा फोटो काढला आणि योग्य ती फी देऊन एक नवीन अनुभव घेऊन बाहेर पडलो.
( सदाशिव पेठ पुणे लिमयेवाडी तिरुपती surgical समोर)
अशी ऊदारमनाची समाजाचेऋण जपणारी माणसे लाखात एक- दोनच असतात...
त्यांना salute..
नितीन पाठक
'डॉक्टरांकडे जायचं म्हणजे जरा खिशाला कात्री लागण्याचीच वेळ' अशी सर्वसाधारण भावना निर्माण झालेली असताना पुण्यातल्या एका डॉक्टरांनी वेगळीच भूमिका स्वीकारली आहे.. या डॉक्टरांकडे गेलात, तर तपासणीची फी त्यांची रिसेप्शनिस्ट तुम्हाला सांगत नाही.. उलट तुम्हाला हवी तेवढी, परवडेल तेवढी फी तुम्ही तिथं देऊ शकता.. कारण यांचा नियमच आहे तसा! हे डॉक्टर आहेत पुण्यातील पोटाच्या विकारांचे तज्ज्ञ डॉ. रघुनाथ गोडबोले.
काही दिवसांपूर्वी डॉ. गोडबोले यांच्या एका रुग्णाने त्यांच्या रिसेप्शन डेस्कवरील पाटीचे छायाचित्र काढून स्वत:च्या 'फेसबुक वॉल'वर टाकले. त्यातून डॉ. गोडबोले यांच्या या कार्याची माहिती सर्वदूर पसरली. 'रुग्णांना परवडेल तेवढी फी त्यांनी द्यावी' ही त्यांची भूमिका सध्या सोशल मीडियामध्ये 'व्हायरल' झाली असली, तरीही प्रत्यक्षात गेली ११वर्षं ते हे काम करत आहेत. अगदी अचूक तारखेनुसार सांगायचं, तर 1 जानेवारी 2009 पासून..
विशेष म्हणजे, ही सुविधा देऊनही काहीच फी न देणारा एकही रुग्ण भेटला नसल्याचे डॉ. गोडबोले यांनी आवर्जून सांगितले. तसेच, एका रुग्णाने तर तपासणी केल्यानंतर एका वर्षाने फी आणून दिल्याचा अनुभवही डॉ. गोडबोले यांनी सांगितला. डॉ. गोडबोले आज 61 वर्षांचे आहेत. अशीच तंदुरुस्ती कायम राहिली, तर वयाच्या 75 व्या वर्षापर्यंत ही प्रॅक्टिस करण्याची त्यांची इच्छा आहे.