IPLच्या तेराव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर! जाणून घ्या कुठे आणि कोणात होणार पहिला सामना?
आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी आता केवळ एका महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. आयपीएलच्या हंगामाची सुरुवात 29 मार्चपासून होणार आहे. त्यामुळं चाहत्यांमध्ये या हंगामाची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान आता या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत. हंगामाचा पहिलाच सामना हायवोल्टेज असणार आहे, कारण हा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडेवर होईल.
क्रिकबजनं दिलेल्या माहितीनुसार, या हंगामातील सामना 29 मार्च ते 17 मे दरम्यान खेळले जातील. आयपीएलचा 12वा हंगाम 44 दिवस चालला होता, तर तेरावा हंगाम 50 दिवस चालणार आहे.
या हंगामाचा लीग स्टेजमधील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. दरम्यान नॉकआऊट स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. राजस्थान रॉयल्स वगळता इतर सर्व संघाचे सामने त्यांच्या घरच्या मैदानावर होतील. तर राजस्थान संघाचे सामने गुवाहटी येथे होणार आहेत.
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या म्हणण्यानुसार, यावर्षी सहा दिवसांत फक्त एकाच दिवशी दोन सामने खेळले जातील आणि हे सामने फक्त रविवारी होणार आहेत. यामुळे, लीगमध्ये एक आठवडा वाढविण्यात आला आहे, ज्यामुळे यावेळी आयपीएल 44 त्याऐवजी 50 दिवस खेळला जाईल. दुपारचे सामने चार वाजता तर रात्रीचे सामने आठ वाजता सुरू होतील.
बीसीसीआयने या हंगामात एएम लोढा समितीच्या शिफारशींकडे पुन्हा दुर्लक्ष केले आहे, ज्यात म्हटले आहे की भारतीय संघाचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आणि आयपीएलच्या पहिल्या सामन्यामध्ये कमीतकमी दोन आठवड्यांचा फरक असावा. यावेळी भारतीय संघ आपला अंतिम आंतरराष्ट्रीय सामना 18 मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळेल, तर आयपीएल 11 दिवसानंतरच सुरू होईल.