चिमुकल्यांना मुख्यमंत्री म्हणाले, 'आता आमदार होऊनच विधिमंडळात या'

नाशिक : ‘आता तुम्ही विमानाने विधामंडळात कामकाज पहायला आलात. पुढच्या वेळी शिक्षण घेऊन, अधिकारी, आमदार होऊन थेट कामकाजात सहभागी होण्यासाठी या,” अशा म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळाचे कामकाज पाहायला आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिवसेनेचे प्रभाग सभापती संतोष गायकवाड यांनी महापालिका शाळेच्या पंचवीस विद्यार्थ्यांना विमानाने विधीमंडळ कामकाज पाहण्यासाठी नेले होते. यावेळी विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांशी अचानक भेट झाली. यावेळी ते बोलत होते.
शिवसेनेचे नगरसेवक संतोष गायकवाड यांच्या पुढाकाराने आनंदवलीच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या पाचवी ते सातवीच्या पंचवीस विद्यार्थ्यांची सहल नाशिकहून विमानाने विधीमंडळाचे कामकाज पाहण्यासाठी घेऊन गेले होते. हे विद्यार्थी विधान परिषदेचे कामकाज पाहण्यासाठी जात असतांना मुख्यमंत्री तेथून जात होते. एव्हढे विद्यार्थ्यी पाहिल्यावर त्यांनी उत्सुकतेने त्यांची चौकशी केली. तुम्ही कसे आलात? काय पाहिले? असा त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी साक्षी राजगुरू आणि विकास कोळी या विद्यार्थ्यांनी आम्ही विमानाने आलो. सरकार कसे काम करते ते पहायचे आहे,” असे सांगीतले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त करुन, अरे व्वा. यावेळी विमानाने विधीमंडळात आलात. चांगले शिक्षण घेऊन अधिकारी व्हा. आयएएस, आयपीएस होऊन या. आमदार व्हा. पुढच्या वेळी थेट विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी या,” असे विद्यार्थ्यांना सांगितले.
नाशिक ते मुंबई हवाई सफर केलेल्या या विद्यार्थ्यांनी गेटवे ऑफ इंडिया, सायन्स सेंटर, हॅंगींग गार्डन, गिरगाव चौपाटी, छत्रपती शिवाजी महाराज आतरराष्ट्रीय विमानतळ देखील पाहिले. विधीमंडळाच्या भेटी दरम्यान जलसंपदा मंत्री जयंत पाटील, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे, आमदार सरोज आहिरे, आमदार दिलीप बनकर यांचीही भेट घेतली.