वन विभागाने पाठ फिरवली
*हत्तीबेटाची वाळवंटाकडे वाटचाल---
पर्यटक व वन्य जीवांचे हाल
उदगीर- लातूर जिल्ह्यातील पर्यटक व भाविकांचे आकर्षण ठरलेल्या हत्तीबेट पर्यटन स्थळाकडे वन विभागाने आता कायमचीच पाठ फिरवली असल्याने हत्तीबेटाची वाटचाल आता वाळवंटाकडे सुरू झाली आहे. या गडावर पिण्याचे पाणी असूनही वन विभागाची यंत्रणा लक्ष देत नसल्याने हत्तीबेटावर येणाऱ्या पर्यटक/भाविक व तेथील वन्य जीवांचे हाल सुरू झाले आहेत.
हत्तीबेट पर्यटन स्थळ हे वन विभागाच्या ताब्यात आहे. पर्यटन व निसर्ग पर्यटन विकासाची कामे करताना या ठिकाणी स्वतंत्र हत्तीबेटाचा कार्यभार असलेला वनरक्षक नेमून हत्तीबेटाची विकास कामे केली आहेत. शिवाय उदगीरच्या वन परिमंडळ अधिकारी यांनी आठवड्यातून चार दिवस हत्तीबेटास भेट देऊन तेथील विकास कामावर लक्ष देवून विकास कामांना चालना देण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू होते, मात्र गेल्या तीन वर्षांपासून या ठिकाणी दोन-तीन ठिकाणचा पदभार असलेले वनरक्षक व वन परिमंडळ अधिकारी दिल्यामुळे हत्तीबेटाचा विकास ठप्प झाला आहे.
वन विभागाने निसर्ग पर्यटनाच्या प्रस्तावात हत्तीबेटासाठी नवीन पद निर्मिती न करता या ठिकाणी स्वतंत्र वनरक्षक, चार माळी, चार सुरक्षा रक्षक नेमून या ठिकाणचा विकास करण्यासाठी वन परीक्षेत्र अधिकारी, अहमदपूर यांनी वरिष्ठांना हमीपत्र दिले होते. या हमी पत्राची या परीक्षेत्र कार्यालयाने केराची टोपली दाखवली आहे. सन2009 पासून या ठिकाणी एकच वन मजूर कार्यरत आहे. आठ वर्षे वन विभागाने या ठिकाणी सर्व स्वतंत्र यंत्रणा उभी करून विकास कामे राबवली, मात्र गेल्या तीन वर्षांपासून अहमदपूर, लातूर च्या वन अधिकाऱ्यांनी हत्तीबेटाकडे दुर्लक्ष केल्याने विकास ठप्प झाला आहे.
विभागीय वन अधिकारी व मुख्य वन संरक्षक(प्रादेशिक)यांनी हत्तीबेटा संदर्भात केलेल्या सुचना व आदेशाची अंमलबजावणी लातूर व अहमदपूर येथील वन अधिकाऱ्यांनी केली नसल्याने याचा फटका हत्तीबेटाला चांगलाच बसला आहे.
सन2019 या वर्षभरात 24 लाखाच्या वर पर्यटक/भाविकांनी हत्तीबेटास भेट दिली आहे. या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देवून त्यांच्या सुरक्षेसाठी वन विभागाची जबाबदारी असतांना गेल्या सहा महिन्यापासून वन विभागाने हत्तीबेटाकडे कायमची पाठ फिरवली आहे.
या संदर्भात हत्तीबेट विकास समितीने 1 जानेवारी2020 पासून हत्तीबेटाला न्याय मिळण्याच्या मागणीसाठी नागपूरच्या वन भवनासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर उस्मानाबादचे विभागीय वन अधिकारी गायकर यांनी हत्तीबेटास भेट देवून पाहणी केली आहे. हत्तीबेटाच्या मागण्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवला असल्याचे लेखी पत्र समिती सदस्यांना दिले आहे.
वन विभागाचे कोणीही कर्मचारी, अधिकारी हत्तीबेटाला येत नसल्याने माथ्यावरची झाडे पाण्याअभावी वाळून जात आहेत. पाणी असूनही परवाच्या एकादशी व महाशिवरात्री सहा हजारांच्या वर भाविक हत्तीबेटावर आलेले असतांना या भाविकांना पिण्याचे पाणीही मिळाले नाही.
*वरिष्ठांच्या सहकार्याशिवाय मी काही करीत नाही
वनरक्षक घुले
हत्तीबेटावर दररोज उदभवणाऱ्या समस्याची सोडवणूक करण्यासाठी पैशाची गरज आहे. माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला पैसे दिले तरच हत्तीबेटाच्या समस्या मी दूर करेन अन्यथा मी काहीही करू शकत नाही. सध्या असलेल्या 9 मजुरांच्या पगारी मी देवू शकत नाही. हत्तीबेटाच्या सुरक्षेसाठी कुलूपबंद ठेवा, तुम्ही कोणी पण कामावर येऊ नका असे या मजुरांना सांगण्यात आले आहे. कोणत्याही कामांसाठी पैसा लागतो, वरिष्ठांनी दिला तर हत्तीबेटावर उदभवलेल्या समस्या दूर करेन.
गोविंद घुले, प्रभारी वनरक्षक, हत्तीबेट पर्यटन स्थळ.
* पाणी आजच सुरू करणार
हत्तीबेटावर येणाऱ्या पर्यटक व भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय आजच करण्यासाठी तेथील वन मजुरास सांगण्यात आले आहे.
वन्य जीवासाठी बांधण्यात आलेली पाणवठे पण पाण्याने भरून घेण्यासाठी सांगण्यात आले आहे.
गोविंद माळी,
प्रभारी वन परिमंडळ अधिकारी, हत्तीबेट पर्यटन स्थळ.
* देखभाल, दुरुस्ती होत नसेल तर अधिकार सोडावा
हत्तीबेट पर्यटन स्थळ हे वन विभागाची शान व मान उंचावणारे स्थान आहे. लातूर व उस्मानाबाद या दोन जिल्ह्यात हत्तीबेटासारखे पर्यटन स्थळ कोठेही नाही. असे असताना वन विभाग याकडे पाठ फिरवत असेल तर हत्तीबेट पर्यटन स्थळावर आमचा कोणताही अधिकार नाही. व याची देखभाल व दुरुस्ती पण हा विभाग करू शकत नाही. असे कार्यालयीन पत्र जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देवून मुक्त होवून अधिकार सोडावा,अन्यथा हत्तीबेटाची संपूर्ण जमीन ही वन विभागाच्या ताब्यात असल्याने त्यांनीच या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी उदभवणाऱ्या समस्या सोडवणे बंधनकारक आहे.
दत्ता पाटील, विधिज्ञ, नगरसेवक ,हत्तीबेट विकास समिती.
ReplyForward |